जिल्ह्यातील शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे

20 Nov 2025 18:05:36
गडचिरोली, 
Efforts to improve educational quality जिल्ह्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी करावी. तसेच शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन विभागीय शिक्षण संचालक डॉ. माधुरी सावरकर यांनी केले. गडचिरोली येथे गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ व मार्गदर्शन सभा पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या सभेला शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) बाबासाहेब पवार, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) अमरसिंग गेडाम, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले आदी उपस्थित होेते. पुढे मार्गदर्शन करताना डॉ. सावरकर म्हणाल्या, शाळाप्रमुखांनी व शिक्षकांनी इयत्ता शाळांमध्ये दहावी व बारावीची परीक्षा कॉपीमुक्त राबविण्यात यावी. यासोबतच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही, स्क्वाड आणि निरीक्षण पथकांची नियुक्ती करावी.
 
 
gaschi
 
 
तसेच विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासपद्धती, प्रश्‍नपत्रिका पद्धत व वेळ व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे. तसेच पालक, शिक्षक व गावपातळीवर जनजागृती करावी. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय व एनएमएमएस परीक्षेची तयारी करावी. तसेच निपून महाराष्ट्र कार्यक्रमातर्गत इयत्ता पहिली ते तिसरीसाठी वाचन, लेखन व गणित कौशल्य विकसित करावे. महिन्यात एकदा निपून चाचणी घेण्यात यावी. दीक्षा अ‍ॅप व ब्रिज कोर्सचा वापर करावा. परख सर्वेक्षण 2023 अंतर्गत वर्गनिहाय कौशल्यांवर आधारित अध्यापनाची गरज असल्याचे नमूद करित निकालाचे विश्‍लेषण करून विषयनिहाय कृती आराखडा व शिक्षक प्रशिक्षणावर भर देण्यात यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत शाळांचे भौतिक स्वरुप सुधारणा करण्यासाठी तसेच शाळांची स्वच्छता, हरितकरण यासाठी सीएसआर फंड, स्थानिक संस्था व पालक समितीच्या सहकार्य घ्यावे. ‘हिंदी की चादर’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना इतिहास, देशभक्ती व गुुरू तेगबहादूर संघटनेचा परिचय द्यावा. पोस्टर स्पर्धा, प्रश्‍नमंजुषा, निबंध व भाषण स्पर्धांचे आयोजन करावे.
 
 
यासोबतच शाळांमध्ये वाचन संस्कृती वाढ, मानसिक आरोग्य व समूपदेशन उपक्रम राबविण्यात यावे. तसेच तांत्रिक शिक्षण व डिजिटल साक्षरता वृद्धिंगत करण्यासाठी उपक्रमांचे आयोजन करावे. 26 नोव्हेंबर रोजी शाळांमध्ये संविधानदिन कार्यक्रमाचे आयोजन करावे. यामध्ये संविधानाची प्रस्तावना वाचन, प्रबोधनात्मक व्याख्यान, वादविवाद, निबंध व प्रश्‍नमंजुषा स्पर्धा घ्याव्यात. तसेच मुलभूत हक्क व कर्तव्यांचे जनजागरण करावे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास, प्रत्यक्ष कार्यानुभव व शिस्त, प्रयोगशिलता, प्रकल्पाधारित शिक्षण व नवोन्मेषासाठी संधी मिळावी, याकरिता स्काऊट, गाईड शिबिराचे आयोजन करावे. तसेच तंबाखूमुक्त शाळा अभियान, शुगर बोर्डची अंमलबजावणी करित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, लठ्ठपणा, डायबेटीस जागरुकता, पौष्टीक आहार व योग व्यायाम ही उपक्रमे शाळांमध्ये राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0