विकासाच्या बाता; तरीही शहरातील समस्या ‘जैसे थे’च

20 Nov 2025 18:37:37
गोंदिया,
Gondia Municipal Council Elections येथील नगरपरिषद निवडणुकीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. २२ प्रभागातील ४४ सदस्य व नगराध्यक्ष पदासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षासह इतर पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा मुख्यालय असलेल्या गोंदिया नगर परिषदेची स्थापना सन १९२० साली झाली. सुरवातील १० सदस्य संख्या असलेल्या गोंदिया नगरपरिषदेत आता २२ प्रभाग असून ४४ सदस्य संख्या आहे. नगराध्यक्षाची निवड थेट मतदारांकडून होणार आहे. शंभर वर्षाचा इतिहास असलेल्या येथील नगरपरिषदेत प्रमुख राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगली. गत काळात शहराचा विकास झाल्याचा गवगवा राजकारणी करत आहेत. मात्र शहरात फेरफटका मारल्यावर वास्तव दिसून येतो. शहरातील एकही रस्ता आज सुस्थितीत नाही. नाल्या घाणीने तुंबल्या आहेत. रस्त्यावर जिकडे तिकडे घाण, कचरा पसरलेला दिसतो. दिवसेंदिवस शहराचे वसाहतीकरण होत आहे. या तुलनेत नागरी सुविधा उपलब्ध करण्यात स्थाानिक पदाधिकारी व यंत्रणा कमी पडली आहे. अनेक भागात आजही पक्के रस्ते, नाल्या नाहीत, पिण्याचे पाणी पोहचले नाही.
 
 
 
Gondia Municipal Council Elections
 
शहरातील रस्ते अतिक्रमनात लिप्त झाले आहेत. वाहतूक कोंडी नित्यातीच बाब झाली आहे. शंभर वर्षाच्या काळात नगरपरिषद प्रशासन व पदाधिकारी यांना कचरा व्यवस्थापनाची सोय करता आली नाही. सत्ता उपभोगलेले पदाधिकारी आता विकास केल्याचा गवगवा करून मतांचा जोगवा मागत आहेत. जो-तो उमेदवार शहराच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही मतदारांना देत आहे. शहराच्या विकासापेक्षा स्थानिक पुढार्‍यांनी केवळ राजकारण केले. यात शहराचा विकास ठप्प झाला. पदाधिकारीच पालिकेचे ठेकेदार बनले. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्याची दुरवस्था, घाणीचे साम्राज्य, ठिकठिकाणी कचर्‍यांचे ढीग, शौचालयांची दुरवस्था, मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा त्रास, विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरवासीयांतून व्यक्त होत आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार्‍या नेतृत्वाला संधी आहे. विविध शासकीय योजनांचा अभ्यास असणार्‍या तसेच त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार्‍या उमेदवारांची पाठ राखण करण्याची मानसिकता शहरातील मतदारांकडून व्यक्त होत आहे. शहरात लहान मुलांसाठी बाल उद्यान उभारण्याची गरज आहे. प्रौढांसाठी स्वतंत्रपणे विहार परिसर विकसित करण्याची आवश्यकता आहे. शिक्षित युवक-युवतींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत. वाचनालय अभ्यासिकेची आवश्यकता असल्याचे मत युवक-युवतींनी व्यक्त केले. एकंदरीत शहरात विविध विकास कामे करण्यासाठी मोठी संधी असून सामाजिक जाणिवेतून समाज विकास करु पाहणार्या कामसू क्रियाशील नेतृत्वाला नगरसेवक होण्याचे संधी मिळू शकते.
Powered By Sangraha 9.0