कारंजा न. प. निवडणुकीत अपक्ष बांधणार मोट?

20 Nov 2025 18:30:38
कारंजा लाड, 
Independent in Karanja N. P. elections पक्षीय तिकिटांचे राजकारण, गटबाजी, आणि स्थानिक पातळीवरील अंतर्गत असंतोष या सर्वाचा स्फोट झाल्याने अपक्ष उमेदवारांची अभूतपूर्व मोट कारंजा नगर परिषद निवडणुकीत उभी राहली आहे. पक्षांच्या अंतर्गत चाललेल्या राजकीय गणितांना रोखठोक प्रत्युत्तर म्हणून ही अपक्ष लाट निर्माण झाली. नगराध्यक्ष पदासाठी काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. तर १५ प्रभागात देखील नगरसेवक पदासाठी अनेक अपक्षांनी कंबर कसली आहे. यंदाच्या एका नगराध्यपदासाठी १३ आणि ३१ नगरसेवक पदासाठी १८३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यात अपक्षांची संख्या फार मोठी असल्याने तिकिटाच्या राजकारणाचा परिणाम काय होतो याचे जिवंत उदाहरण या निवडणुकीत दिसणार आहे.
 
 

Independent in Karanja N. P. elections 
 
अनेक पक्षांनी निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून कोलांटउड्या मारणार्‍यांना आणि पात्रता नसलेल्या निकटवर्तीय उमेदवारांना पक्षाची उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत अपक्षांची संख्या वाढली. आता अपक्ष जर निवडणूक लढले तर मतांचे विभाजन होऊन पक्षाचे उमेदवार पराभूत होतील या भीतीने त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी विविध पक्षाकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. २१ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत काही तासांवर आल्याने सर्वच पक्षाचे नेते अपक्षांच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे. अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षाशी निष्ठा ठेवून काम करत होते, पण तिकिट वाटपात वरिष्ठांच्या मनातल्या राजकीय आकडेमोडीस प्राधान्य दिल्याने असंख्य कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष म्हणूनच उमेदवारी भरण्याचा निर्णय घेतला. दूरधडपड, समजावणी, बैठका, फोन कॉल, दबाव ही सर्व तंत्रे अपक्षांच्या माघारीसाठी वापरली जात असली तरी अपक्ष उमेदवारांचा सूर मोकळा आणि खंबीर आहे. त्यासाठी सर्व अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार असलेल्या प्रबळ नेतृत्वाखाली एका व्यासपीठावर येऊन निवडणुकीतून माघार न घेता एकजुटीने निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
Powered By Sangraha 9.0