व्हॉट्सअ‍ॅपवरील अब्जावधी युजर्सची माहिती लीक

20 Nov 2025 14:28:17
पर्थ,
Information leaked on WhatsApp सावधान! व्हॉट्सअ‍ॅपचा चर्चेत असलेला सर्वात मोठा डेटा लीक प्रकरण समोर आले असून तब्बल ३.५ अब्ज युजर्सचे मोबाइल नंबर उघड झाल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकारामागे कोणत्याही हॅकरचा हात नसून व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी मेटाचीच मोठी चूक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, मेटाला गेली आठ वर्षे ही सुरक्षा त्रुटी माहित होती, तरीही कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नाही.
 
 
whatsapp number
 
वायर्डच्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ वियना येथील संशोधकांनी व्हॉट्सअ‍ॅप सिस्टममध्ये एक गंभीर सुरक्षा उणीव शोधून काढली. या त्रुटीमुळे कोणालाही व्हॉट्सअ‍ॅप वेबचा वापर करून अब्जावधी नंबर एकाचवेळी एंटर करत, ते व्हॉट्सअ‍ॅपवर सक्रिय आहेत की नाही हे तपासता येत होते. ही प्रक्रिया इतकी सहज होती की कोणत्याही तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नव्हती. संशोधकांनी या पद्धतीने जगभरातील बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप खात्यांचे नंबर मिळवले. त्यापैकी ५७ टक्के युजर्सचे प्रोफाइल फोटो, तर २९ टक्क्यांचा प्रोफाइल स्टेटस मजकूर देखील उघड झाला.
 
 
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असलेल्या साध्या वैशिष्ट्यातून ही त्रुटी उघड झाली. एखाद्याचा नंबर एंटर करून ते व्हॉट्सअ‍ॅपवर आहेत का हे सहज पाहता येतेच; त्याचबरोबर त्यांचा फोटो आणि नावही दिसते. संशोधकांनी याच पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करून तपासणी केली. अखेर समोर आलेल्या निकालाने डिजिटल जगतात खळबळ उडाली. या प्रकाराची सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे २०१७ मध्येच लोकांनी मेटाला ही त्रुटी सांगितली होती, परंतु कंपनीने वर्षानुवर्षे कोणतीही दखल घेतली नाही. अखेर एप्रिल २०२५ मध्ये संशोधकांनी पुन्हा अहवाल दिल्यानंतर मेटाने ऑक्टोबरमध्ये सुधारणा करत, एकावेळी अनेक नंबर एंटर करण्यावर मर्यादा घातली. या मर्यादेला ‘रेट लिमिट’ असे नाव देण्यात आले.
 
 
मेटाने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की उघड झालेले नंबर, फोटो वा मजकूर प्रत्यक्षात आधीपासून सार्वजनिकच होते. म्हणजेच, ज्यांची प्रोफाइल दृश्यता ‘पब्लिक’वर होती, त्यांचीच माहिती उघड झाली असून प्रायव्हसी सेटिंग वापरणाऱ्यांना धोका नव्हता. तसेच या त्रुटीचा हॅकर्सनी अद्याप गैरफायदा घेतल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा मेटाने केला आहे. या खुलास्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Powered By Sangraha 9.0