थायलंड,
Miss Jamaica Gabrielle Henry थायलंडमध्ये सुरू असलेल्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधीच तीन न्यायाधीशांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या वादात आता मिस जमैका गॅब्रिएल हेन्री यांच्या अपघाताची भर पडली आहे. इव्हिनिंग गाऊन राऊंडदरम्यान रॅम्पवर चालत असताना त्यांचा तोल सुटला आणि त्या थेट स्टेजवर कोसळल्या. उपस्थितांमध्ये काही क्षणांसाठी गोंधळ निर्माण झाला आणि तत्काळ त्यांना स्ट्रेचरवर जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पडल्याचा झटका बसलेल्या प्रेक्षकांसह जगभरातील चाहत्यांनी त्यांच्या प्रकृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली. यानंतर मिस युनिव्हर्स जमैका ऑर्गनायझेशनने त्यांच्या इंस्टाग्रामवर अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली की गॅब्रिएल हेन्री यांना पाओलो रंगसिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना कोणतीही गंभीर किंवा जीवघेणी दुखापत झालेली नाही, मात्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे घोषित करण्यापूर्वी काही आवश्यक चाचण्या कराव्या लागणार आहेत.