थायलंड,
Miss Jamaica Gabrielle Henry थायलंडमध्ये सुरू असलेली मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धा सतत चर्चेत आणि वादांच्या भोवऱ्यात सापडत आहे. काही दिवसांपूर्वी या इव्हेंटशी संबंधित तीन ज्युरी सदस्यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यातच आता स्पर्धेच्या सुरुवातीला आणखी एक चिंताजनक घटना घडली आहे. ईव्हनिंग गाऊन सेगमेंटदरम्यान मिस जमैका गैब्रिएल हेनरी स्टेजवर चालताना अचानक कोसळल्या, ज्यामुळे क्षणभर कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला. त्यांना लगेच स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आले.
या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात दिसते की गैब्रिएल हेनरी रॅम्पवर चालताना संतुलन गमावतात आणि जोरात पडतात. प्रेक्षक आणि आयोजक काही क्षणांसाठी घाबरून जातात. अपघातानंतर त्यांना तत्काळ पाओलो रंगसिट या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
“चिंतेचे कारण नाही”
मिस युनिव्हर्स जमैका ऑर्गनायझेशनने 19 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामद्वारे हेनरींच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की डॉक्टर्सनी तपास केल्यानंतर त्यांच्यात कोणतीही गंभीर किंवा जीवघेणी दुखापत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, पूर्णपणे निरोगी घोषित करण्यापूर्वी त्यांना काही वैद्यकीय तपासण्या पूर्ण कराव्या लागतील.मिस युनिव्हर्स जमैका संस्थेने एक अधिकृत निवेदन जारी करून प्रेक्षक आणि चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. निवेदनात म्हटले आहे,

“डॉ. गैब्रिएल हेनरी, मिस युनिव्हर्स जमैका 2025, थायलंडमध्ये होणाऱ्या अंतिम फेरीपूर्वी प्राथमिक स्पर्धेतील ईव्हनिंग गाऊन राउंडमध्ये स्टेजवरून पडल्या. त्यांना पाओलो रंगसिट रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे आणि डॉक्टर्सनी त्यांच्यात कोणतीही जीवघेणी दुखापत नसल्याचे सांगितले आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी सकारात्मक विचार पाठवत तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी.”मिस युनिव्हर्स 2025 आधीच वाद आणि अडचणींनी वेढली असताना ही घटना स्पर्धेभोवतीची चिंता अधिक वाढवणारी ठरली आहे. तथापि, गैब्रिएल हेनरी लवकरच बऱ्या होतील, अशी आशा आयोजक आणि चाहत्यांनी व्यक्त केली आहे.