गडचिरोली,
Naapur Shopping Center शेतकर्यांना खरेदी हंगामात कोणतीही अडचण येऊ नये, नोंदणी प्रक्रिया सर्वांपर्यंत पोहोचावी व पारदर्शक कारभार राखला जावा यावर भर देत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कापूस व धान खरेदी नोंदणीसंबंधीची संपूर्ण माहिती प्रत्येक शेतकर्यापर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी पंडा यांनी चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कापूस व धान खरेदी प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी एम. अरुण, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, तहसीलदार प्रशांत घोरूडे, गटविकास अधिकारी माधुरी येरमे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा द महाराष्ट्र स्टेट को. ऑफ मार्केटिंग फेडरेशन मुंबई संचालक अतुल गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी यावेळी बाजार परिसराची सविस्तर पाहणी करून संबंधित अधिकार्यांशी संवाद साधला.

शेतकर्यांना खरेदी केंद्रांवर कोणतीही अडचण येऊ नये, नोंदणीपासून दररोजच्या लिलावापर्यंत सर्व प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक असावी, खरेदी हंगाम निकडचा असल्याने शेतकरी केंद्रावर दाखल होताच त्यांना स्पष्ट मार्गदर्शन, नोंदणी सहाय्य व तात्काळ सेवा देण्याच्या सूचना दिल्या. बाजार समितीचे संचालक अतुल गण्यारपवार यांनी कापूस खरेदी नोंदणीसाठी बाजार समितीमार्फत शेतकर्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे व प्रसारमाध्यमांद्वारे खरेदीसंबंधीची माहिती व्यापक पातळीवर प्रसारित करण्यात येत असल्याचे सांगितले. आधारभूत खरेदी केंद्रावर ताडपत्री, इलेक्ट्रिक वजन काटे, मोइस्चर मीटर, पाण्याची व्यवस्था तसेच शेतकर्यांसाठी लिलाव गृह, गोदाम, अडत गाळे, शौचालय, पिण्याचे पाणी आणि राहण्याची सोय बाजार समितीकडून उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी यांनी अनखोडा येथील आस्था जिनिग प्रोसेसिंग येथे व येणापूर आधारभूत धान खरेदी केंद्रावरही भेट दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सहकार व पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.