पाटणा,
New political mathematics in Bihar बिहारमध्ये सत्तेवर पुनरागमन केल्यानंतर नितीश कुमार यांनी १०व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात मोठे बदल करण्यात आले आहेत. पाटण्यातील गांधी मैदानात झालेल्या शपथविधीत एनडीए आघाडीतील घटकपक्षांचे एकूण २६ आमदार मंत्री म्हणून समाविष्ट झाले. विशेष म्हणजे, मागील सरकारमधील तब्बल १९ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून १२ नवे चेहरे मंत्रिमंडळात सामील करण्यात आले आहेत. जेडीयू कोट्यातील सर्व आठ मंत्र्यांची पुनरावृत्ती करण्यात आली असताना, भाजपने केवळ पाच जुन्या मंत्र्यांना परत संधी दिली असून सहा नवीन नेत्यांचा समावेश केला आहे. भाजपच्या नवीन मंत्र्यांमध्ये रामकृपाल यादव, संजय सिंह टायगर, अरुण शंकर प्रसाद, रमा निषाद, लखेंद्र कुमार रोशन आणि श्रेयसी सिंह यांचा समावेश आहे.

लोजपा (रामविलास) गटातूनही दोन नवे मंत्री समोर आले आहेत, संजय कुमार आणि संजय कुमार सिंह. महुआ मतदारसंघात तेज प्रताप यादव यांचा पराभव करणाऱ्या संजय कुमार सिंह यांना देखील मंत्रिपद देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आरएलएमचे दीपक प्रकाश, उपेंद्र कुशवाह यांचे पुत्र, यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात एकच मुस्लिम सदस्य असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या फेरबदलात अनेक वरिष्ठ मंत्र्यांना वगळण्यात आले आहे. वगळण्यात आलेल्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री रेणू देवी, नीरज सिंग बबलू, केदार प्रसाद गुप्ता, कृष्ण कुमार मंटू, जीवेश मिश्रा, महेश्वर हजारी, राजू सिंग, डॉ. सुनील कुमार, संजय सरावगी, संतोष सिंग, जनक राम, शिला मंडल, नितीश मिश्रा, विजय कुमार मंडल, प्रेम कुमार, हरी साहनी, कृष्ण नंदन पासवान, रत्नेश सदा आणि जयंत राज या नावांचा समावेश आहे.
मागील सरकारमधील मंत्री सुमित कुमार सिंह हे निवडणूक हरल्यामुळे आणि मोतीलाल प्रसाद यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे ते सहाजिकच मंत्रिमंडळाबाहेर राहिले. त्यांच्या जागी वैद्यनाथ प्रसाद यांना तिकीट मिळाले. स्वत: नितीश कुमार हे विधान परिषदेचे सदस्य असून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. ते देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांपैकी एक असून मागील १९ वर्षांपासून राज्याच्या सत्तेचे नेतृत्व करत आहेत. या निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्ता प्राप्त केली. त्यात भाजपला ८९, जद(यू) ला ८५, लोजपा(आरव्ही) ला १९, एचएएमला ५ आणि आरएलएमला ४ जागा प्राप्त झाल्या, आणि त्यानंतर नव्या मंत्रिमंडळाची प्रभावी रचना समोर आली आहे.