तभा वृत्तसेवा
साकोली,
Sakoli-Reservation : नगर परिषद साकोली सेंदुरवाफा येथील निवडणूक 2 डिसेंबर रोजी होऊ घातली आहे. त्यादृष्टीने 20 नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देश पत्र मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. अशातच या नगर परिषदेत घोषित झालेले आरक्षण 55 टक्के झाले आहे. यामुळे निवडणूक लढविण्यास इच्छूकांमध्ये कुणी कायदेशीररित्या आक्षेप घेतल्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल की नाही? याबाबत चर्चांना उत आला आहे.
निवडणुकीत आरक्षण 50 टक्के पेक्षा जास्त होऊ नये या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना फाटा देत साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद निवडणुकीत आरक्षण 50 टक्के पेक्षा अधिक म्हणजे 55 टक्के झाले असल्याने याकडे लक्ष वेधले आहे.
सदर नगर परिषदेच्या हद्दीतील 10 वार्डातील 20 उमेदवारांसाठी निवडणूक होत आहे. नामप्र ओबीसी साठी 5, अनुसूचित जातीसाठी 5 व अनुसूचित जमातीसाठी 1 अशा 11 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. ही संख्या मूळ सदस्य संख्येच्या 55 टक्के होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार ओबीसी साठी 25 टक्के, अनुसूचित जातीसाठी 25 टक्के व अनुसूचित जमातीसाठी 5 टक्के असे प्रमाण निघते. यासाठी तहसीलदार, जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त आदींनी लक्ष देणे गरजेचे होते. अधिका-यांनी निवडणूक क्षेत्रातील मतदार संख्येवर आरक्षण टक्केवारी न काढता प्रभागानुसार आरक्षण टक्केवारी काढली असल्याची शक्यता असल्याचे एका जाणकाराने व्यक्त केली. तर काही नागरिक या चुकीविरूध्द न्यायालयातून दाद मागता येईल का? याचा तज्ञांकडून सल्ला घेऊन कोर्टात जाण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले जाते.