धक्कादायक...वृद्धाश्रमातून १६ जेष्ठ नागरिक रस्त्यावर सोडले

20 Nov 2025 16:17:47
पुणे,
Senior citizens left पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील ‘आस्क ओल्ड एज होम’ या दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे ससून रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी सोपवण्यात आलेले १६ जेष्ठ नागरिक अक्षरशः रस्त्यावर सोडण्यात आले. या वृद्धांना योग्य देखभालीची हमी देणारी ही संस्था प्रत्यक्षात फुरसुंगी येथे चालणाऱ्या वृद्धाश्रमाची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गायकवाड यांनी सरकारकडे मोफत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली नाही, त्यामुळे वृद्धांना भारत फोर्ज कंपनीजवळील मोकळ्या जागेत ठेवण्यात आले.
 
 
Senior citizens left pune
 
कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर बसलेल्या १६ वृद्धांपैकी काहींना गंभीर जखमा होत्या आणि रक्त वाहत होते. ससून रुग्णालयाकडून सांभाळण्यासाठी सोपवलेल्या इतर रुग्ण या ठिकाणी आढळून आले नाहीत, तर गायकवाड आणि ससून रुग्णालयाचे अधिकारी परस्पर जबाबदारी ढकलताना दिसले. यावेळी एका वृद्धाला पाणी पाजत असलेल्या महिलेला विचारले असता ती त्यांची मुलगी असल्याचे सांगितले, परंतु वडिलांना घरी का नेत नाही, याबाबत ती मौन राहिली. घटनेची दखल घेत समाजकल्याण खात्याने हस्तक्षेप केला असून फुरसुंगी येथील आश्रमाला मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी १६ पैकी १५ वृद्धांना पुन्हा त्या आश्रमात हलवण्यात आले, तर एका जेष्ठ नागरिकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. समाजकल्याण आयुक्त दीपा मुंडे यांनी सांगितले की, पुढील काळात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल.
 
याच प्रकरणात प्रकाश पुरोहित नावाचे एक ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाले आहेत. २३ सप्टेंबर २०२४ रोजी कोथरूडमधील नातेवाईकांनी त्यांना ससूनमध्ये दाखल केले होते. त्यानंतर पुन्हा हॉस्पिटलमध्ये न आल्याने ४ डिसेंबरला त्यांना गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपवण्यात आले. मात्र गायकवाड यांनी त्यांना पुन्हा ससूनमध्ये सोडल्याचा दावा केला, तर ससून रुग्णालयाने हा दावा नाकारला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तपास सुरू केला असून प्रकाश पुरोहित यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0