मुंबई,
Shiv Sena-MNS alliance आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेना-ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील युतीच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबईत अखेर शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली आहे. सूत्रांनुसार, उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेला सुमारे सत्तर जागा देण्यास तयार असल्याचे समोर आले आहे, मात्र यापर्यंत कोणताही ठराविक फॉर्म्युला ठरलेला नाही. जागावाटपावर अंतिम निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका आणि चर्चांनंतर होणार आहे.
मनसेकडे आधीच ज्या प्रभागांमध्ये ताकद आहे अशा १२५ जागांची यादी तयार आहे. यामध्ये साधारणपणे ७० जागा शिवसेना मनसेला देण्यास सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्ष चर्चा सुरू झाल्यावर मनसे या वाटपावर समाधानी राहील की नाही आणि या प्रक्रियेत वाटाघाटी होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे मनसेशी युती करण्यास आग्रही असून, त्यामुळे जागावाटपात अधिकीत जास्तीत जास्त जागा घेण्याचा प्रयत्न करताना मनसेला कुठल्याही प्रकारे दुखवू नये, अशी रणनिती ठाकरेंच्या पक्षाकडे असल्याचे समजते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसाठी ही अस्तित्वाची लढाई असून, दोन्ही पक्ष धोका पत्करणार नाहीत. जागावाटपाची यापूर्वी प्राथमिक चर्चा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. आता दुसऱ्या फेरीत या चर्चेत आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे.