तहानलेल्या लोकांची वेदना

20 Nov 2025 09:22:19
 
 
वेध 
 
नंदकिशोर काथवटे
pain of thirsty people कधी काळी नदीचे पाणी, विहिरीचे पाणी किंवा तलावाचे पाणी पिऊन पिढ्या जगल्या. गावकुसाशी वाहणारी नदी म्हणजे गावाची जीवनरेखा आणि विहिरीचा थंडगार घोट म्हणजे समाधान. त्या काळी कोणाला कल्पनाही नव्हती की माणूस एक दिवस पाण्याचाही व्यापार करेल. पण कुठल्या तरी महाभागाने मोफत मिळणाऱ्या या संपत्तीला बाटलीत कैद करून विकण्याची शक्कल लढवली आणि त्या एका कल्पनेतून आज जगभरात पाण्याचा उद्योग अरबो-खरबो रुपयांचा व्यवसाय झाला आहे. पूर्वी ज्यासाठी निसर्गाकडे ऋण मानायचो, तेच पाणी आज एक लिटरच्या बाटलीत 20 रुपयांना विकले जात आहे. काही कंपन्यांनी तर या पाण्याचा दर 80, 100 आणि त्याहून अधिक रुपये नेमला. एक लिटरच्या पाण्याची बाटली 100 रुपयांना? आणि दुसरीकडे शेतकरी जिवापाड मेहनत करून पिकवलेल्या एक किलो धान्याची किंमत त्यापेक्षा कमी? हा विरोधाभास नाही तर हा व्यवस्थेचा उपहास आहे. पण या वास्तवाकडे कोणाचेच लक्ष नाही. कोणाचीही भुवई हलत नाही. सुरुवातीला बाटलीबंद पाण्याचा बाजार सुरू झाला. नंतर जार आले आणि आज तर चिल्ड वॉटर कॅन रस्त्यावर, चौकात, दुकानात सर्वत्र सर्रास विकले जातात. त्या कॅनमध्ये असलेले पाणी खरोखर ‘मिनरल वॉटर’ आहे का? ते शुद्ध आहे का? त्या कॅनची स्वच्छता होते का? या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. कारण कोणी तपासतच नाही. लोकांच्या आरोग्याशी निगडित असूनही या व्यवसायावर कोणाचाच अंकुश नाही.
 
 
 
वॉटर बॉटल
 
 
 
लोकांना स्वच्छ पाणी पुरवणे हे सरकारचे मूलभूत कर्तव्य आहे. पण नळांमधून गढूळ, अशुद्ध किंवा कमी प्रमाणात पाणी आले तर सामान्य माणूस काय करणार? त्याला बाटलीबंद किंवा कॅनमधील पाणी घ्यावेच लागते; आणि हीच असहायता कंपन्यांसाठी सुवर्णसंधी ठरली आहे. सरकारकडून मिळणाऱ्या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत गेली, त्याच वेळी वॉटर फिल्टर कंपन्यांनी घराघरात जागा मिळवली. केंट, अ‍ॅक्वागार्ड यांच्यासारख्या कंपन्यांनी प्रचंड विस्तार केला. पूर्वी गावातील लोक ‘नैसर्गिक’ पाणी पिऊन तंदुरुस्त राहत. त्यातून त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढायची. पण आज प्युरिफायरमधून निघणाऱ्या ‘अतिशुद्ध’ पाण्याने शरीराची इम्युनिटी कमी करण्याचे काम सुरू आहे; ज्यात नैसर्गिक खनिजे असतात ते निघून जातात आणि शरीर नाजूक होत जाते. हे कोणालाच दिसत नाही का? कोणालाच विचारावंसं वाटत नाही का?
आपण प्रगतीच्या नावाखाली निसर्गापासून किती दूर आलो आहोत, याची जाणीवही समाजाला करून देणारे कोणी नाही. सर्वांत मोठी शोकांतिका म्हणजे सरकार गप्प आहे. हे सरकार लोकांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करतेय. स्वच्छ पाणी मिळणे हा हक्क आहे, सुविधा नाही. पण या हक्काचे रक्षण कोण करणार? आज प्रश्न पाण्याच्या बाटलीच्या किमतीचा नाही. प्रश्न आहे समाजाच्या आरोग्याचा, शेतकऱ्याच्या श्रमांचा आणि लोकांच्या हक्कांचा. सरकारने आता तरी कान उघडावे. नळातून स्वच्छ पाणी देणे हे त्यांचे कर्तव्य आहे, व्यवसाय करण्याची मुभा देणे नव्हे. पाण्याच्या नावाखाली सुरू झालेल्या या निर्लज्ज नफेखोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत तर उद्या श्वास घेण्यासाठीही बाटल्या विकल्या जातील आणि तेव्हा आपण सर्व जण आपल्या निष्क्रियतेची किंमत मोजत राहू. पाण्याचा प्रश्न हा फक्त पाण्याचा राहत नाही; तो जगण्याचा होतो. पाणी म्हणजेच जीवन. पण हेच जीवन आज व्यवसायाच्या गणितात कैद झालं आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही गल्लीबोळात जा, चिल्ड वॉटर या नावाखाली कुणीही एक साधा वॉटर फिल्टर लावून पाणी विकताना दिसेल.pain of thirsty people या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची शासनाकडे खरंच कोणती यंत्रणा आहे का? आठवड्याला, महिन्याला किंवा किमान वर्षातून एकदाही अशा कॅनमधील पाण्याची चाचणी केली जाते का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे आहेत का? ही पाण्याची बाजारपेठ आता अरबो-खरबोंच्या व्यवहारात रूपांतरित झाली आहे. हे असे सुरू राहिले तर दिवस दूर नाही, जेव्हा हवासुद्धा बाटलीत बंद होईल आणि लोकांना श्वास घेण्यासाठी पैसे मोजावे लागतील. ज्या देशात नदी, विहीर, तलाव या निसर्गाने दिलेल्या संपत्तीवर लोक पिढ्यान्पिढ्या जगले, त्या देशातच श्वासही विकला जाईल, हे कल्पनेतही न मावणारे पण हळूहळू सत्यात उतरणारे चित्र आहे. पाण्याचा प्रश्न हा आता फक्त संसाधनाचा नाही, तर आपल्या अस्तित्वाच्या भविष्याचा प्रश्न बनला आहे. सरकारने आता तरी जागे होऊन लोकांच्या जीवनाशी खेळ करणाऱ्या या बेकाबू पाण्याच्या व्यापारावर नियंत्रण आणले पाहिजे नाहीतर पुढची पिढी आपल्यालाच प्रश्न विचारेल की, जिथे पाणी मोफत मिळत होतं, तिथं तुम्ही जगाला तहानलेलं का ठेवलं?
9922999588
Powered By Sangraha 9.0