वर्धा,
tm-1-tiger : समुद्रपूर तालुक्यात अधिवास असलेल्या ‘टीएम-१’ या नर वाघाला बेशुद्ध करून पिंजराबंद करण्याचे आदेश वनविभागाला मिळाले. या वाघाने आतापर्यंत २० पाळीव जनावर ठार केले असले तरी त्याने अद्याप कुठल्याही मनुष्यावर हल्ला केलेला नाही. टीएम-१ हा नर वाघ अतिशय चपळ असून मानवाची चाहूल लागताच तो घनदाट जंगलाकडे धूम ठोकतो. या वाघाला पिंजराबंद करण्याचे आदेश असले तरी मागील काही दिवसांपासून एनएनटीआर, पीआरटी व वनविभागाच्या चमूंना गुंगारा देत आहे. वनाधिकारी आणि कर्मचारीही वाघाला पकडण्यासाठी समुद्रपूर तालुक्यात तळ ठोकून आहेत.

समुद्रपूर तालुयातील खुर्सापार, गिरड, शिवणफळ परिसरात अधिवास असलेल्या टीएम-१ वाघाने २० पेक्षा अधिक जनावरांना ठार केले. शेत शिवारापर्यंत येत असल्याने मानव-वन्यजीव संघर्षाची भीती व्यत केली जात असून वाघाला पिंजराबंद करण्याचा आदेश सप्टेंबर महिन्यात पीसीसीपीएफ (वन्यजीव) यांनी दिला आहे. हा आदेश निर्गमित होताच टीएम-१ वाघाला बेशुद्ध करण्यासाठी चंद्रपूर येथील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रविकांत खोब्रागडे हे समुद्रपूर तालुयात दाखल झाले. ६ दिवस त्यांनी समुद्रपूर तालुयात तळही ठोकले होते. पण वाघ ट्रेस होत नसल्याने त्यांनी वर्धा जिल्ह्यातून काढता पाय घेतला. नंतर नवेगाव नागझिरा टायगर रिझर्वर (एनएनटीआर)ची पाच सदस्यीय चमू समुद्रपूर तालुयात दाखल झाली. सुमारे ३० जणांचा समावेश असलेल्या पीआरटीच्या ६ चमू, वनविभागाच्या ३० कर्मचार्यांचा समावेश असलेल्या ४ चमू सध्या जंगल पिंजून वाघाचा शोध घेत आहेत.
टीएम-१ हा वाघ अतिशय चपळ आणि रुबाबदार आहे. त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, मानवाची चाहूल लागताच तो घनदाट जंगलाच्या दिशेने धूम ठोकतो. इतकेच नव्हे तर तो अवघ्या २४ तासांत सुमारे ४० किमीचे अंतर पार करीत आपल्या अधिवासाचे ठिकाणच बदलत असल्याचे अधिकारी व कर्मचार्यांच्या निरीक्षणात पुढे आले आहे.
ट्रॅपसह सीसीटीव्ही अन् ड्रोन कॅमेर्यांचाही वापर
संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टळावा तसेच टीएम-१ या वाघाला बेशुद्ध करून सुरक्षित पिंजराबंद करण्यासाठी वनविभागाच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू आहेत. स्थानिकांचे सहकार्य घेत दररोज ८ ते १० किमीची गस्त घालत वाघाला ट्रेसही केले जात आहे. पण, त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जंगलात लावण्यात आलेल्या १० सीसीटीव्ही, ३५ हून अधिक ट्रॅप कॅमेरा तसेच वेळोवेळी उडविल्या जाणार्या थर्मल व साध्या अशा दोन ड्रोन कॅमेर्यांनाही चकमा देत आहे.