जम्मू,
Weapons seized from Kashmir Times office जम्मूतील स्थानिक काश्मीर टाइम्सच्या कार्यालयावर गुरुवारी राज्य तपास संस्था (SIA) यांनी छापेमारी केली. सकाळी साधारण सहाच्या सुमारास झालेल्या या कारवाईत एके-47 रायफलच्या गोळ्या, एक पिस्तूल तसेच ग्रेनेड लीव्हर यांसह काही शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली. SIA च्या मते, वृत्तपत्राच्या कामकाजात देशविरोधी कारवायांना पाठिंबा दिल्याचा आणि दहशतवादी विचारसरणींशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर टाइम्स हे वरिष्ठ पत्रकार वेद भसीन यांनी स्थापन केलेले दैनिक असून काही काळापासून त्यांनी जम्मूमधून प्रिंट आवृत्ती बंद करून ऑनलाइन स्वरूपात कामकाज सुरू ठेवले आहे. वेद भसीन यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी अनुराधा भसीन आणि त्यांचे पती प्रबोध जामवाल यांनी वृत्तपत्राची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, दोघेही गेल्या काही काळापासून अमेरिकेत राहत असून सध्या वृत्तपत्राचे ऑनलाइन कामकाजच सुरू आहे. त्यांच्या वेबसाइटवर प्रबोध जामवाल संपादक आणि अनुराधा भसीन व्यवस्थापकीय संपादक म्हणून नोंद आहेत.
छाप्यादरम्यान कार्यालय उघडण्यासाठी SIA अधिकाऱ्यांनी वृत्तपत्राचे व्यवस्थापक संजीव केर्नी यांना घरातून बोलावले. काही दिवसांपूर्वी या वृत्तपत्राविरोधात एफआयआर दाखल झाला असून त्याच चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याआधीही काश्मीर टाइम्सच्या जम्मू-काश्मीर कार्यालयांवर देशविरोधी मजकूर प्रकाशित केल्याच्या आरोपावरून छापे टाकण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून वृत्तपत्राचे नियमित प्रकाशनही बंद आहे.
दिल्लीत १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटानंतर जम्मूसह अनेक शहरांत तपास वाढवण्यात आला आहे. या मार्गावर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. तपासाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणून फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठ समोर आले असून, डॉ. उमर, डॉ. आदिल, डॉ. मुझम्मिल आणि डॉ. शाहीन यांचे विद्यापीठाशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर अलीकडेच या संस्थेवरही कारवाई करण्यात आली आहे.