काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर कारवाई : मुळक

21 Nov 2025 21:39:33
वर्धा, 
Rajendra Mulak : आर्वी नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदाच्या २६ उमेदवारांना ए बी फॉर्म न मिळाल्याची तक्रार जिल्हा प्रभारी व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडे करण्यात आली होती. नगर पालिकेच्या निवडणुकीत होऊ घातलेले सर्व उमेदवार आपल्याच पक्षाने आपल्याच उमेदवारांचा व नेत्यांचा घात करण्याचे कारण काय हा प्रश्न घेत ओरड करत होते. याबाबत जाब विचारत काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी समितीचे शैलेश अग्रवाल व प्रदेश महासचिव अनंत मोहोड यांच्यासह सर्व पदाधिकारी व उमेदवार यांनी जिल्हा प्रभारी राजेंद्र मुळक यांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणी जिल्हाध्यक्षावर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रभारी राजेंद्र मुळक यांनी दिल्याची माहिती शैलेश अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
 
 
 
jk
 
 
 
राजेंद्र मुळक यांना दिलेल्या पत्रात काँग्रेसचे ए बी फॉर्म राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांच्याकडे कसे, देवेंद्र खंडाते, प्रियंका भीमके, पंकज वाघमारे व प्रीती सुरवाडे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या चिन्हावर कसे, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म पोहचवण्यात असमर्थता दर्शविणार्‍या जिल्हाध्यक्षाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या चिन्हावर लढविण्यासाठी अमर काळे व बाळा जगताप यांना एबी फॉर्म कोणाच्या परवानगीने व केव्हा दिले? सर्वसंमतीने तयार केलेली प्रभारींच्या मान्यतेतील यादी वगळून वेळेवर जगताप यांची पत्नी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर अर्ज सादर करण्याचे कारण काय असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
 
 
राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी समितीचे प्रतिनिधी, प्रदेश महासचिव, शहर अध्यक्ष या सर्वांना डावलून जगताप यांना ८ सदस्यांचे व १ अध्यक्षाचा एबी फॉर्म दिला कसा? राष्ट्रवादीच्या चौघांनी काँग्रेसचे एबी लावले तर त्यातील काँग्रेसचे उर्वरित ४ एबी फॉर्म मग गेले कुठे? स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात यश संपादीत करत असलेली आर्वीतील काँग्रेस कुणाच्या निर्देशावरून गहाण टाकण्यात आली? आर्वी, हिंगणघाट व वर्धा मतदार संघात तह करणार्‍या नेत्याची दादागिरी का खपवायची? आर्वीत स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता उमेदवारी जिल्हाध्यक्षानी कशी दिली. या सर्व प्रश्नांची उत्तरं देत हा प्रकार आपणांस मुळीच आवडला नसल्याचे सांगत जिल्हा प्रभारी राजेंद्र मुळक यांनी एबी फॉर्म शहर अध्यक्ष सुधाकर भुयार यांच्याकडेच पाठविण्याचे पक्षाचे निर्देश असल्याचे कळविले. एबी फॉर्म शहर अध्यक्षांकडे न पाठवता इतरत्र पाठविल्याबाबत जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर दोषी असल्याचे प्रभारी राजेंद्र मुळक म्हणाले असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0