५.५० लाख मतदार: मनपाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

21 Nov 2025 10:11:36
अकोला,
Akola 5.50 lakh voters आगामी मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने गुरुवारी प्रारूप मतदार यादी मनपाच्या सभागृहात प्रसिद्ध केली आहे. ५ लाख ५० हजार १२८ एकूण मतदार आहेत. यामध्ये २,७४,९११ पुरुष, २,७५,१७६ महिला आणि ४१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मनपाच्या संकेतस्थळावर देखील यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नवीन तारखा जाहीर करणारे परिपत्रक नुकताच काढले.आयोगाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात आली.
 
 

akola
 
 
हरकती आणि सूचना सादर करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर आहे. या कालावधीत, नागरिकांना त्यांचे नाव, पत्ता किंवा इतर तपशील दुरुस्त करण्याची संधी असेल. त्यानंतर, प्राप्त झालेल्या हरकतींवर निर्णय घेऊन दुरुस्त यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अंतिम, दुरुस्त केलेली प्रभागनिहाय मतदार यादी ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी ८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.
 
 
दुबार मतदारांना करावा लागणार अर्ज
शहरात एकूण १७ हजार ७०० दुबार मतदार असून मतदार यादीत दुबार मतदारांच्या नावापुढे चिन्हांकीत करण्यात आले आहे.दुबार मतदारांना आपले नाव या प्रभागातून कमी करण्यात यावे असा अर्ज दाखल करावा लागणार आहे किंवा मतदान करताना आपण या मतदार संघात मतदान करणार आहाेत, असे पत्र मतदान केंद्राधिकाऱ्यांकडे द्यावे लागणार आहे.
 
 
आयोगाच्या निर्देशाप्रमाणे २० नोव्हेंबर रोजी मनपाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी एकूण ५ लाख ५० हजार १२८ एकूण मतदार आहेत.ही यादी मनपाच्या सभागृहात व संकेतस्थळावर पाहता येणार आहे.याशिवाय प्रत देखील मिळणार आहे.
अनिल बिडवे
निवडणूक विभाग प्रमुख, मनपा अकोला
Powered By Sangraha 9.0