नागपूर,
Bhushan Mehere : लोककलांना आधुनिक रूप देणे आणि आजच्या पिढीला आवडेल असा ‘स्वॅग’ निर्माण करणे ही काळाची गरज होती. आम्ही नऊ वेगवेगळे लोककलाप्रकार कथानकात गुंफून ‘The Folk आख्यान’ चा प्रयोग उभा केला. याचा पहिला प्रयोग 21 जुलै 2024 रोजी पार पडला होता. त्या वेळी मर्यादित 200 प्रेक्षक असतानाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी झपाट्याने वाढली की आपल्या लोककलेत किती अफाट ताकद आहे, हे आमच्या लक्षात आले, असे मत ‘The Folk आख्यान’ क्युरेटर व निर्माते भूषण मेहरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, मोहगाव (झिल्पी) यांच्या वतीने आणि विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपुरात यंदा प्रथमच ‘मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा – 2025’ चे आयोजन 22 ते 27 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन लोकप्रिय लोकसंगीत आणि लोकनृत्यप्रयोग ‘The Folk आख्यान’ च्या भव्य सादरीकरणाने उदया, 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता लक्ष्मीनगरच्या व्हॉलिबॉल मैदानावरील राम गणेश गडकरी रंगमंचावर होणार आहे. या निमित्ताने नागपुरात आले असताना मेहरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला ‘The Folk आख्यान’ विदर्भात प्रथमच सादर होत असून त्याचा विदर्भातील पहिला प्रयोग नागपुरात होत आहे. हर्ष विजय यांची मूळ संकल्पना असलेल्या या प्रयोगाचे आतापय्रंत 74 प्रयोग झाले आहेत. यात 20 कलाकारांसह एकुण 55 सदस्यांची टीम आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यात नमन, गण, गवळण, जात्यावरची गाणी, गोंधळ, लावणी, घाटोळी, सुंबराण आणि पौड यांसारख्या लोकपरंपरांचा संगम पाहायला मिळणार आहे. कार्यक्रमाला आवश्यक तेवढा आधुनिक ग्लॅमरही देण्यात आल्याचे मेहरे यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम नि:शुल्क असून लोकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे प्रफुल्ल माटेगावकर आणि नरेश गडेकर यांनी केले.