गोध्रा,
Death of groom and family गुजरातमधील गोध्रा येथे घडलेली एक ह्रदयद्रावक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली. आनंदाने उजळलेल्या लग्नाच्या दिवशीच एका घरातून वरासह चार अंत्ययात्रा निघाल्याने वातावरण शोकमय झाले. वर्धमान ज्वेलर्सचे मालक कमलभाई दोशी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आगीत गुदमरून मरण पावल्याने गोध्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गोध्रातील बमरोली रोडवरील गंगोत्री नगर सेतू क्लब येथे राहणाऱ्या कमलभाई दोशी यांचा २४ वर्षीय मुलगा देव दोशी याचे त्या दिवशीच लग्न होणार होते. सकाळी वधूपक्षाला भेटण्यासाठी कुटुंब वापीकडे जाणार होते. पण रात्रीच घडलेल्या अनर्थाने सर्व आनंद क्षणात नाहीसा झाला.
संग्रहित फोटो
कुटुंबातील सर्वांनी हसतगोष्टी करत रात्री झोपी गेले. मात्र हीच त्यांच्या आयुष्यातली शेवटची रात्र ठरेल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. मध्यरात्री घराच्या तळमजल्यावरील सोफ्याला आग लागली. शॉर्ट सर्किट हे संभाव्य कारण मानले जात असले तरी नक्की कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संपूर्ण घर काचेने झाकलेले असल्याने आग लागल्यानंतर विषारी धूर झपाट्याने पसरला. झोपलेल्या कुटुंबाला ना जाग येऊ शकली, ना बाहेर पडण्याची संधी मिळाली. काही क्षणांतच धुराने सर्वांना गुदमरून चारही जणांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत पावलेल्यांमध्ये ५० वर्षीय कमलभाई दोशी, त्यांची पत्नी ४५ वर्षीय देवलाबेन, त्यांचा मोठा मुलगा देव आणि २२ वर्षीय धाकटा मुलगा राज यांचा समावेश आहे. अग्निशमन विभागाला कळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले; पण घरातील परिस्थिती इतकी भीषण होती की सर्वांना मृत अवस्थेतच बाहेर काढण्यात आले. लग्नाच्या दिवशी वराच्या मृतदेहासह संपूर्ण कुटुंबाचे शव बाहेर आल्याचे दृश्य पाहून परिसरातील लोकही अश्रू अनावर झाले. या घटनेने गोध्रा शहर शोकाकुल झाले असून समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. जीवनातील सुखद क्षण एकाच क्षणात कसे दुःखद बनू शकतात, याचे हे अतिशय वेदनादायक उदाहरण ठरले आहे.