५२ जणांची माघार; ४६५ उमेदवार रिंगणात

21 Nov 2025 18:42:42
गोंदिया,  
elections जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा नगर परिषद आणि सालेकसा, गोरेगाव नगर पंचायतीची निवडणूक २ डिसेंबरला होत आहे, या निवडणुकीसाठी एकूण ४३८ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. आता निवडणूक रिंगणात नगराध्यक्षपदाचे २७ तर नगरसेवक पदाचे ४३८ उमेदवार आहेत.
 

election 
 
गोंदिया, तिरोडा नगर परिषद तसेच सालेकसा व गोरेगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरवात झाली. १७ नोव्हेंबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या दिवसांत नगराध्यक्षपदासाठी एकूण ४४, तर नगरसेवकपदाकरिता एकूण ७०० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. उल्लेखनीय म्हणजे, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या १७ नोव्हेंबर या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत आपापले नामांकन अर्ज दाखल केले. १८ नोव्हेंबर रोजी नामांकन अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या दिवशी गोंदियात नगराध्यक्षपदासाठी एकूण १६, तर नगरसेवकपदासाठी ४०७ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. छाननीत नगराध्यक्षपदाचे दहा, तर नगसेवकपदाचे १२३ नामांकन अर्ज बाद झाले होते. तिरोड्यात नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. आठही उमेदवार कायम होते, तर नगरसेवकपदासाठी नामांकन अर्ज दाखल करणार्‍या ११७ उमेदवारांपैकी १८ अर्ज छाननीत बाद झाले. ९९ अर्ज कायम होते. सालेकसा येथे नगराध्यक्षपदासाठी एकूण १४ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यापैकी छाननीत सहा अर्ज बाद झाले. आठ उमेदवारांनी नामांकन अर्ज कायम ठेवले होते.elections तसेच नगरसेवकपदासाठी ९१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २१ अर्ज बाद, तर ७० उमेदवारांनी नामांकन अर्ज कायम ठेवले होते. गोरेगाव येथे नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. आठही उमेदवार कायम होते, तर नगरसेवकपदाकरिता एकूण ८४ उमेदवारांपैकी १६ उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाले होते, ६८ उमेदवारांचे नामांकन अर्ज कायम होते. दरम्यान, नामांकन अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवशी (अपील नसेल तिथे) अर्थात शुक्रवारी (ता. २१) चारही ठिकाणी एकूण ५२ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले असून, ४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना २६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे.
रिंगणातील उमेदवार
स्था.स्व.संस्था नगराध्यक्ष नगरसेवक
गोंदिया ६ २२८
तिरोडा ७ ९१
गोरेगाव ७ ५६
सालेकसा ७ ६३
एकूण २७ ४३८
Powered By Sangraha 9.0