नागपूर,
Orange Clean Plant Project : संपूर्ण भारतात नागपूरची संत्रानगरी ही खास ओळख आहे. ती ओळख टिकून राहण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या राेपांची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेत येथील संत्रा उत्पादन उच्च दर्जाचे हाेण्यासाठी 70 काेटी रुपये खर्चून संत्रा ‘क्लीन प्लांट सेंटर’ नागपुरात उभे राहणार असल्याची महत्वपूर्ण घाेषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चाैहान यांनी अॅग्राेव्हिजनमध्ये केली. यासाठी चांगल्या नर्सरींचा शाेध घेत माेठ्या नर्सरीला 4 काेटीपर्यंत तर मध्यम नर्सरीला 2 काेटी पर्यंत अर्थसहाय्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.
मध्य भारतातील सर्वात माेठे कृषी प्रदर्शन ‘अॅग्राेव्हिजन 2025’ चे उद्घाटन शुक्रवार, 21 नाेव्हेंबर राेजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चाैहान यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती राेडवरील मैदानावर करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. अॅग्राेव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयाेजन करण्यात आले आहे.
चाैहान म्हणाले, विदर्भातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना आणि कृषी अभ्यासकांना अॅग्राेव्हिजन कायमच मार्गदर्शन करीत आले आहे. त्यामुळे आज मी देखील एक शेतकरी म्हणूनच येथे आलाे आहे. केवळ चिंता प्रकट करून उपयाेग नाही. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेती आणि पशुपालन एकाच नाण्याच्या दाेन बाजू असल्याने दुग्धाेत्पादन आणि पशुपालनाची शेतीला जाेड आवश्यक आहे. शेतीच्या प्रगतीत महिलांच्या श्रमाकडे कुणीच दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीला आता लखपती बनविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी आयाेजन सचिव रवी बाेरटकर यांनी प्रास्ताविक केले. पशुखाद्य प्रकल्पाने ऑनलाईन उद्घाटनही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, सहकारिता राज्यमंत्री डाॅ. पंकज भाेयर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, एसएमएलच्या श्रीमती काेमल, नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू माधवी खाेडे, पीडीकेव्ही चे कुलगुरू डाॅ. शरद गडाख, माफसुचे कुलगुरू नितीन पाटील, ग्लाेबल काॅर्पाेरेट अँड इंडस्ट्री सागर काैशिक, महिंद्राचे अध्यक्ष विजय राम नाकरा, अॅग्राेव्हिजन आयाेजन समितीचे सल्लागार डाॅ. सी. डी. माई, डाॅ. गिरीश गांधी, रमेश मानकर, सुधीर दिवे, विजय जाधव, कॅप्टन एल. बी. कलंत्री, प्रशांत कुकडे, डाॅ. हितेंद्र सिंग, नितीन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
वन्यप्राणी आणि अतिवृष्टीची भरपाई आता पीक विम्यातून
शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उतन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहे. परंतु नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल हाेताे. दुष्काळासाेबतच अतिपाण्याने पिके खरडून निघतात. वन्यप्राण्यांमुळेही शेतपिकांचे माेठे नुकसान हाेते. यातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पंतप्रधान पीक विमा याेजनेतून या नुकसानीची भरपाई दिला जाणार असल्याची माहितीही चाैहान यांनी यावेळी दिली.
अॅग्राे कन्व्हेन्शन सेंटरच्या मदतीने हाेणार आर्थिक विकास - नितीन गडकरी
16 वर्षांपासून सातत्याने अॅग्राेव्हिजनचे यशस्वी आयाेजन केवळ शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाने शक्य झाले आहे. हा प्रवास विदर्भाच्या कृषी विकासाची ऐतिहासिक यात्रा असल्याचे अध्यक्षीय भाषणात नितीन गडकरी म्हणाले. आता याही पुढे जात स्पेन मध्ये ज्याप्रकारे फार्मर बिजनेस स्कूल आहे, त्याच धर्तीवर अमरावती राेडवरील पीडीकेव्ही मैदानावर अॅग्राे कन्वेंशन सेंटर मध्ये जागतिक दर्जाचे फार्मर बिजनेस स्कूल तयार हाेत आहे. यातून विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनाचा आर्थिक विकास झपाट्याने हाेऊ शकेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. विदर्भातील शेतकरी येत्या काही वर्षात एकरी दहा ते बारा टन संत्र्याचे उत्पादन घेऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लिंबूवर्गीय कलमांच्या अधिकृत नर्सरीमध्ये वृद्धी व्हावी अशी विनंती त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चाैहान यांना केली. एआय तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रासाठी नवी दिशा ठरणार असल्याचे ते स्वानुभवातून म्हणाले.
शेतीत तरुणांचा सहभाग वाठविण्यासाठी प्रयत्न करणार - दत्तात्रय भरणे
शेतीत चांगले प्रयाेग करावेत, चांगले वाण वापरावे, शेतीपूरक व्यवसाय करावेत आणि बदल करावा असा सल्ला राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. पेरणी ते कापणी पर्यंत राज्य सरकारचा शेती विभाग शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास तत्पर आहे. कृषी संजीवनी सारख्या याेजना राज्य राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. अॅॅग्राे व्हिजन मधून मिळालेल्या सूचना आणि मार्गदर्शन यावर राज्यसरकार साकारत्मत विचार करेल तसेच शेतीत तरुणांचा सहभाग वाठविण्यासाठी प्रयत्न करणार, असेही ते म्हणाले.
बुटीबाेरी मध्ये जनावरांच्या चारा प्रकल्पाचे भूमिपूजन
मराठवाडा आणि विदर्भाच्या 19 जिल्ह्यातील शेकऱ्यांकडून 6 लाख लीटर दूध संकलन एनडीडीबी द्वारे केले जाते अशी माहिती एनडीडीबीचे प्रमुख डाॅ. मिनेश शाह यांनी दिली. भारतात सध्या डेयरी उद्याेगात परिवर्तन येत आहे. 2016 मध्ये एनडीडीबीने विदर्भ क्षेत्रात कार्य सुरू केले, पुढील वर्षी याच मंचावर 6 लाख लीटर क्षमतेच्या प्रकल्पाचे उद्घाटन हाेईल असे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय आज बुटीबाेरी मध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले ताे देखील पुढील वर्षी पर्यन्त कार्यान्वित हाेईल असे ते म्हणाले.