उडुपी,
Secret information of a naval ship leaked कर्नाटकातील मालपे पोलिसांनी भारतीय नौदलाच्या जहाजासंबंधी गोपनीय माहिती लीक केल्याच्या गंभीर आरोपांवरून दोन जणांना अटक केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या आणि अधिकृत गुपिते कायद्यातील तरतुदांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रकरणाने बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये खळबळ उडवली आहे.
शिपयार्डने सुरक्षा उल्लंघनाची तक्रार केल्यानंतर तपासाची सुरुवात झाली. या शिपयार्डमध्ये मेसर्स सुष्मा मरीन प्रायव्हेट लिमिटेडमार्फत नियुक्त केलेला उत्तर प्रदेशातील रोहित (वय २९) इन्सुलेटर म्हणून काम करत होता. रोहित यापूर्वी केरळमधील कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये कार्यरत होता, जिथे नौदलाची जहाजे बांधली जातात. त्याच काळात त्याने गोपनीय जहाज ओळख क्रमांक आणि इतर संवेदनशील माहिती व्हॉट्सअॅपद्वारे बाहेर पाठवल्याचा आरोप आहे. ही माहिती लीक करण्याच्या मोबदल्यात त्याला अनधिकृत आर्थिक लाभ मिळाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
मालपे येथे बदली झाल्यानंतरही रोहितला कोची येथील एका सहकाऱ्याकडून गुप्त माहिती मिळत राहिली, आणि त्याने ही माहिती संशयास्पद व्यक्तींशी शेअर केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, या कृत्यामुळे देशाची स्वातंत्र्य, एकता आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात येऊ शकत होती. उडुपी कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मालपे पोलिसांनी आयपीसी कलम १५२ तसेच अधिकृत गुपिते कायदा, १९२३ च्या कलम ३ आणि ५ अंतर्गत गुन्हा क्रमांक १२८/२०२५ नोंदवला. अटक केलेले दोन्ही आरोपी रोहित (२९) आणि संत्री (३७), हे दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणामुळे शिपयार्डमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.