तांत्रिक अचूकता व पारदर्शकता निवडणूक प्रक्रियेची दोन मजबूत स्तंभ: जिल्हाधिकारी कुंभेजकर

21 Nov 2025 17:41:54
वाशीम,
dc kumbhejkar मतदानापूर्वीची ईव्हीएम तपासणी व सीलिंग प्रक्रिया असो किंवा मतमोजणीसारखी संवेदनशील जबाबदारी या दोन्ही टप्प्यांत अचूकता, शिस्त आणि पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची आहे. संपूर्ण जिल्हा प्रशासनाने एकसंघपणे आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने काम केल्यास उत्तम, निर्दोष आणि विश्वासार्ह निवडणूक प्रक्रिया पार पडेल.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 
 
 
dc kumbhejkar
 
नगर परिषद/पंचायत निवडणूकीच्या पारदर्शक, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या ईव्हीएम कमिशनिंग (मतदानापूर्वी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी, चाचणी, उमेदवारांची नावे सेट करणे व सीलिंग प्रक्रिया) व मतमोजणी प्रशिक्षण सत्राचे आयोजन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. प्रशिक्षणावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त बाबुराव बिक्कड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी धनाजी तोरसकर, महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव आदींची प्रमुख उपस्थित होती.
अपर जिल्हाधिकारी पाटील आणि उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी ईव्हीएम कमिशनिंग व मतमोजणी प्रक्रियेचे सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी व चाचणी, उमेदवारांची नावे सेट करणे,डेमो मतदान, मशीनची सीलिंग प्रक्रिया, स्ट्राँगरूम व्यवस्थापन, मतमोजणी केंद्रांची मांडणी, टेबल मॅनेजमेंट, नियम व खबरदारी याबाबत अधिकार्‍यांना सखोल मार्गदर्शन देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी तांत्रिक अचूकता व पारदर्शकता ही निवडणूक प्रक्रियेची दोन मजबूत स्तंभ आहेत. मतमोजणी हा अत्यंत संवेदनशील टप्पा असल्याने नियमांचे काटेकोर पालन करून प्रत्येक अधिकार्‍याने जबाबदारीने कर्तव्य पार पाडावे. असेही निर्देश दिले.dc kumbhejkar या सर्वंकष प्रशिक्षणामुळे ईव्हीएम कमिशनिंगपासून मतमोजणीकडे जाणार्‍या प्रक्रियेबाबत सर्व अधिकार्‍यांमध्ये स्पष्टता व आत्मविश्वास निर्माण झाला असून आगामी निवडणूक कामकाज अधिक गतिमान आणि शिस्तबद्ध होणार आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि निवडणूक यंत्रणांचे अधिकारी- कर्मचारी हे दुरदृष्यप्रणालीद्वारे प्रशिक्षणास जोडले गेले. त्यामुळे संपूर्ण प्रशासन एकाच वेळी एकसमान पद्धतीने प्रशिक्षित होण्याचा लाभ मिळाला. मतदानपूर्व तसेच मतमोजणीच्या अंतिम टप्प्यातील तांत्रिक कामकाजाबाबत जिल्हा प्रशासन अधिक सज्ज झाले आहे.
Powered By Sangraha 9.0