मुंबई,
Trouble in Thackeray's Shiv Sena शिवसेनेला मोठा धक्का बसला असून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपाने आपल्या राजकीय शक्तीत लक्षणीय वाढ केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. भाजपाच्या ऑपरेशन लोटसला मिळालेल्या यशामुळे अनेक बडे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ चिन्ह स्वीकारत पक्षात प्रवेश केला. धाराशिवमध्ये माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा निरोप घेत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, शिक्षक सेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले.
नगरपरिषद निवडणुकीच्या अगदी उंबरठ्यावर झालेल्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. हा प्रवेश ‘घरवापसी’ असल्याचे भाजपा नेते राणाजगजीतसिंह पाटील यांनी म्हटले आहे. याचसोबत सांगलीच्या आटपाडी तालुक्यातही राजकीय बदलाची मोठी लाट पाहायला मिळाली. रमेश उर्फ बंडू शेठ कातुरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती तानाजी यमगर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राजमाने आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. विक्रम माने, वैभव भानुसे, गणेश कातुरे, हिराप्पा यमगर, अविराज यादव, कैलास शेंडगे आणि वैभव खांडेकर यांनीही कमळाचे चिन्ह हाती घेतले. धाराशिव आणि आटपाडी अशी दोन्ही ठिकाणी झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करत, राज्यातील भाजपची ताकद सातत्याने वाढत असल्याचा विश्वास व्यक्त केला. या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलू लागली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी हा मोठा धक्का म्हणून पाहिले जात आहे.