तभा वृत्तसेवा
वणी,
Municipal Council Elections : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजपाकडून गृहभेटी व कॉर्नर सभांचा जोरदार धडाका सुरू आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विविध भागात जनतेशी थेट संवाद साधत आहेत.
मंगळवार, 18 नोव्हेंबरला सकाळी जैताई मंदिरात दर्शन घेऊन गृहभेट व जनसंवाद मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुधवारी जैन लेआऊटसह प्रभाग 2 व प्रभाग 9 मधील काही भागात प्रचार कॉर्नर मिटिंग घेण्यात आली. या प्रचारात ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे स्वागत केले. जैन लेआऊट येथील बैठकीत संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी केलेल्या परिसरातील विकास कामांचे तपशीलवार विश्लेषण केले. त्यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागात झालेली रस्ते सुधारणा, नाली बांधकामे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्ट्रीट लाइट, सार्वजनिक सोयीसुविधांचा उल्लेख केला. यासोबतच येथील प्रलंबित प्रश्नांवरही मतदारांसमोर स्पष्ट भूमिका मांडली.
आगामी काळात या भागासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार आहेत, कोणती कामे प्राधान्याने केली जातील आणि कोणत्या योजना राबवून सर्वांगीण विकास साधला जाईल, याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. बैठकीदरम्यान उपस्थित शेकडो मतदारांनी बोदकुरवार यांना प्रश्न विचारत आपले मुद्दे मांडले आणि या संवादात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
वणीकराणी मागील निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्याने वणी शहरात रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. यावेळी पुन्हा विश्वास ठेवून निवडून द्या. राहिलेले सर्व कामे आम्ही निश्चित पूर्ण करू, असे आश्वासन संजीवरेड्डी बोदकुरवार मतदारांना देत आहेत.
यावेळी भाजप शहराध्यक्ष अॅड. नीलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, अंकुश बोढे यांच्यासह नप अध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम तसेच सर्व प्रभागातील 29 उमेदवार व भाजपा कार्यकर्ते प्रचारात अग्रेसर आहेत.