मुंबई,
Actress Shubhangi Sadavarte wedding पाच वर्षांचा संसार मोडल्याची घोषणा करून अवघे तीन महिने होत नाहीत तोच अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पुन्हा एकदा नव्या आयुष्याच्या प्रवासाला सज्ज झाली आहे. ‘संगीत देवबाभळी’ या नाटकातून रसिकांची मनं जिंकणारी शुभांगी काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत होती. तिच्या आणि संगीतकार आनंद ओक यांच्या विवाहाला २०२० मध्ये कोरोनाकाळात सुरुवात झाली होती; मात्र मतभेद वाढत गेल्याने दोघांनीही पाच वर्षांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ही घोषणा झाल्यानंतर शुभांगीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यापूर्वीच गायक राहुल देशपांडे यांनीही अोघ्या १७ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्याने मनोरंजन क्षेत्रात चर्चांना उधाण आलं होतं.

अशातच आता शुभांगी सदावर्ते पुन्हा चर्चेत आली आहे, पण यावेळी आनंदाच्या कारणाने. शुभांगी पुन्हा विवाहबंधनात अडकत असून तिचा आणि होणाऱ्या पती सुमीत यांचा केळवणाचा व्हिडिओ समोर आला आहे. शुभांगीने स्वतः इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करत आपल्या नव्या आयुष्याबद्दलची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. काही क्षणांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. शुभांगीचं हे दुसरं लग्न आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने पहिल्या पती आनंद ओकपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी आनंद ओक यांनी पोस्ट लिहून, “परस्पर संमतीने घेतलेला हा निर्णय आम्ही आता सार्वजनिकपणे मांडत आहोत. एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि शुभांगीच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो,” असे म्हटले होते.