जल पर्यटन कामातील भ्रष्टाचाराची होणार चौकशी

22 Nov 2025 21:49:35
भंडारा,
water-tourism-work : शहरात सुरू असलेल्या जल पर्यटनाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली होती. याच निवेदनाचा आधार घेत आ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्यासंदर्भात निर्देश दिल्याचे समजते.
 
 
 
CM
 
 
 
वैनगंगा नदीच्या काठावर कोट्यवधी रुपये खर्च करून जल पर्यटन उभारले जात आहे. मात्र हे करताना केल्या जात असलेल्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने केला होता. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा दुरुपयोग या ठिकाणी होत असून दलित वस्ती चा निधी पर्यटन विकासाच्या कामावर खर्च केला जात आहे. एकाच कामाचे दोनदा बिल काढून शासनाची फसवणूक केली जात आहे, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी केला होता.
 
 
दरम्यान या निवेदनाचा आधार घेत आमदार परिणय फुके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. संपूर्ण कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत जिल्हाधिकारी भंडारा यांना चौकशी करण्यासंदर्भात निर्देशित केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आता जल पर्यटनाच्या कामातील भ्रष्टाचार बाहेर येतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0