नवी दिल्ली,
Death on Air India flight व्हँकूवरहून दिल्लीमार्गे कोलकात्याकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानात प्रवास करणाऱ्या ७० वर्षीय दलबीर सिंग यांची प्रकृती अचानक बिघडल्याने शुक्रवारी रात्री आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. दिल्लीहून चढलेल्या या प्रवाशाने उड्डाणादरम्यान छातीत वेदना आणि तीव्र अस्वस्थता व्यक्त केली. त्यानंतर विमानाने तातडीने वैद्यकीय कारणास्तव रात्री ९:१५ वाजता कोलकाता विमानतळावर लँडिंग केले आणि दलबीर सिंग यांना विमानातून उतरवण्यात आले. तत्काळ त्यांना चार्नॉक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली असून ते कोलकात्याकडे रवाना झाले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात येणार आहे. यानंतर उर्वरित १७६ प्रवाशांसह विमान रात्री १०:१० वाजता पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले.

दरम्यान, एअर इंडियाने मोठा निर्णय घेत १ फेब्रुवारी २०२६ पासून दिल्ली–शांघाय पुडोंग दरम्यानची थेट विमान सेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. जवळपास सहा वर्षांच्या अंतरानंतर चीनसाठीची ही नॉन-स्टॉप सेवा पुन्हा सुरू होत असून, या मार्गावर आठवड्यातून चार उड्डाणे बोईंग ७८७-८ विमानातून चालवली जातील. या विमानांमध्ये १८ बिझनेस क्लास आणि २३८ इकॉनॉमी सीट्स असतील. २००० मध्ये भारत-चीन थेट हवाई संपर्क पुन्हा सुरू झाल्यानंतर आणि राजनैतिक स्तरावर सहकार्य वाढल्यानंतर ही सेवा महत्त्वाची मानली जात होती. मात्र कोविड-१९ महामारी आणि पूर्व लडाखमधील तणावामुळे ही उड्डाणे २०२० पासून बंद होती. एअर इंडिया २०२६ च्या अखेरीपर्यंत मुंबई–शांघाय मार्गही सुरू करण्याची तयारी करत आहे. हा मार्ग नियामक आणि द्विपक्षीय मंजुरीनंतर सुरू होणार असून भारतातील दोन प्रमुख आर्थिक केंद्रे आणि चीनमधील व्यावसायिक क्षेत्र यामधील हवाई कनेक्टिव्हिटीला मोठा वेग मिळणार आहे.