निवडणुकीसाठी तयार केलेले चेकपोस्ट बेवारस

22 Nov 2025 21:58:32
चांदूरबाजार,
elections checkposts नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे जात असताना, निवडणूक आयोगाने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी स्थिर निगराणी पथकाच्या (एसएसटी) चेकपोस्ट उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मोर्शी रोडवरही चेकपोस्ट उभारण्यात आला . मात्र शनिारी सकाळी ८.२१ वाजता भेट दिली असता या चेकपोस्टची स्थिती पाहून नागरिक अक्षरशः चकित झाले. चेकपोस्टवर एकही कर्मचारी उपस्थित नव्हता, त्यामुळे निवडणुकीकरिता तयार केलेले मोर्शी रोडवरील चेकपोस्ट बेवारस झालेले दिसले.
 
 

checkpost 
 
 
२२ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजून २१ मिनिटांनी या चेकपोस्टला दिलेल्या भेटीदरम्यान, संपूर्ण मंडप रिकामा दिसून आला. ना अधिकारी, ना कर्मचारी, ना कोणतेही वाहन तपासणीचे साहित्य पेंडॉलमध्ये केवळ ‘नगरपरिषद निवडणूक स्थिर निगराणी पथक’ असे लिहिलेला फलक मात्र तसाच लटकत होता. या ठिकाणावरून जाणारे नागरिक हा पेंडॉल पाहत, थांबत, फलक वाचत, मात्र कर्मचार्‍यांची हालचाल नसल्याचे बघत पुढे निघून जात होते. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देणे, अनधिकृत रोख रक्कम किंवा साहित्य वाहतूक, दारू वितरण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थिर निगराणी पथकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे या पथकांच्या कार्यक्षमतेवर निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. दिवसाढवळ्या अशा महत्त्वाच्या चेकपोस्टवर एकही कर्मचारी नसल्याचे चित्र उघड होताच नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली. हा पेंडॉल फक्त नावापुरता उभारला आहे की काय?, अशा प्रकारचे प्रश्न नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. साधारणपणे सकाळीच वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू होते. या वेळेला चेकपोस्ट सक्रिय असणे आवश्यक असतानाच पथक पूर्णपणे अनुपस्थित असल्याने प्रशासनाच्या तयारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक काळात वाहतूक तपासणी, संशयास्पद हालचालींवर नियंत्रण, अवैध पैसा किंवा दारू वाहतूक रोखणे आदींसाठी या पथकांना २४ तास ड्यूटीवर राहण्याचे निर्देश असतात. मात्र प्रत्यक्षात मोर्शी रोडवरील चेकपोस्ट पूर्णपणे बेवारस अवस्थेत दिसला.
Powered By Sangraha 9.0