दिल्लीतील कार्यालयांना 50% वर्क फ्रॉम होमची सक्ती

22 Nov 2025 15:06:50
नवी दिल्ली,
Forced Delhi Work From Home दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच प्रदूषणाची स्थिती भयावह बनली असून, शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या ताज्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार अनेक मॉनिटरिंग स्टेशन्समध्ये एक्यूआय 300 ते 430 दरम्यान नोंदवला गेला. नोएडा आणि गाझियाबादसह संपूर्ण एनसीआरमध्येही प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. या वाढत्या धुरक्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने तातडीची कारवाई करत 50 टक्के कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले. ही उपाययोजना GRAP स्टेज III च्या अंमलबजावणीचा एक भाग असेल.
 
 
 वर्क फ्रॉम होम
 
एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने वातावरणातील ही गंभीर स्थिती ओळखून महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये हवा “गंभीर” श्रेणीत गेल्याने GRAP स्टेज IV लागू करण्याची परिस्थिती असली तरी सध्यासाठी स्टेज III अंतर्गत आवश्यक पावले उचलण्यात येणार आहेत. या निर्देशांमध्ये सरकारी, महानगरपालिका तसेच खाजगी कार्यालयांना 50 टक्के कर्मचाऱ्यांसह कामकाज सुरू ठेवण्याचा पर्याय देण्यात आला असून, उर्वरित कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास प्राधान्य देण्याचे सुचवले आहे. केंद्र सरकारलाही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’बाबत निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
 
 
पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की दिल्लीमध्ये GRAP-3 लागू आहे आणि त्यानुसार धूळकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पाणीफवारणी, वाहन तपासणी आणि सीमांवर कडक नजर ठेवण्याचे काम सुरू आहे. कचरा जाळण्यावर बंदी अधिक प्रभावीपणे लागू करण्यासाठी निवासी कचरा विल्हेवाट केंद्रांना 10,000 बायोगॅस हीटर देण्यात आले आहेत, ज्यामुळे रक्षक किंवा कामगारांना कचरा जाळण्याची गरज भासणार नाही. दिल्लीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पश्चिम दिल्लीतील रहिवाशांसाठी “हिवाळी हीटर उपक्रम” सुरू केला आहे. लाकूड आणि कोळसा जाळल्यामुळे वाढणारे प्रदूषण टाळण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून 10,000 हीटर निवासी कचरा विल्हेवाट केंद्रांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रदूषण रोखण्यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्न करत असून, प्रत्येक नागरिकाने योगदान देऊन दिल्लीतील हवा श्वसनयोग्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीची हवा दिवसेंदिवस अधिकच खराब होत असताना सरकार आणि प्रशासनाकडून राबवण्यात येणाऱ्या या उपाययोजना राजधानीला प्रदूषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0