गोंदिया,
gondia-news : जिल्ह्यात गत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने थैमान घालत धान पिकाची प्रचंड हाणी केली. या पावसामुळे तब्बल १ लाख ३२ हजार ८४४ शेतकर्यांचे ४९ हजार १६४ हेक्टर क्षेत्रातील धान पिकाची माती झाली. संबंधित यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानीचा अंतिरिम अहवाल शासनाला पाठविला आहे. नुकसानग्रस्ताना देण्यासाठी ७८ कोटी १३ लाख ५९ हजार ६६५ रुपये निधीची मागणी अहवालात नोंदविण्यात आली आहे.

धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या गोंदिया जिल्ह्यात दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १.९० लाख हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली होती. येथील शेतकरी कमी, मध्यम व अधिक कालावधीच्या धानाचे उत्पादन घेतात. कमी कालावधीचे धान ऑक्टोबर तर मध्यम व अधिक कालावधीच्या धानाचे उत्पादन नोव्हेंबर महिन्यात हाती येते. कमी कालावधीचे पीक हाती येत असतानाच निसर्गाची अवकृपा झाली. २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात परतीचा पाऊस ठाण मांडून होता. या वादळी पावसाने कापणी केलेले, कापणीस आलेले व परिपक्वतेच्या स्थितीत असलेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले. शेतात पाणी साचून राहिल्याने धान अंकुरीत झाले. अनेक ठिकाणी धान शेतातच सडले.
शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने धान उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला. सर्वच स्तरावरून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी झाली. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानीचा अहवाल तयार केला. वादळी पावसाने जिल्ह्यातील ४९ हजार १६४ हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान झाले. तर १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले. गोंदिया तालुक्यातील ५६७१८ शेतकर्यांचे १७१२५ हेक्टरमधिल धानाचे नुकसान झाले. तिरोडा २६०५२ शेतकर्यांचे ११०५२.८७ हेक्टर, आमगाव १७५५८ शेतकर्यांचे ७२१६.०४ हेक्टर, सालेकसा ११८५७ शेतकर्यांचे ४६४८.९४ हेक्टर गोरेगाव ८००३ शेतकर्यांचे ३१३९.८० हेक्टरमधिल, अर्जुनी मोर १३४१ शेतकर्यांचे ६४७.५५ हेक्टरमधिल, देवरी ५५८२ शेतकर्यांचे २६१७.४४ हेक्टरमधिल आणि सडक अर्जुनी तालुक्यातील ५७१० शेतकर्यांचे २७१५.७० हेक्टर क्षेत्रातील धानाचे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल १८ नोव्हेंबर रोजी शासनाला पाठविला असून १ लाख ३२ हजार ८४४ शेतकर्यांना देण्यासाठी ७८ कोटी १३ लाख ५९ हजार ६६५ रुपये निधीची मागणी केली आहे. आता आर्थिक मदतीची राशी नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यावर केव्हा जमा होते याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.