जोहान्सबर्ग,
Important Modi-Albanian meeting जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची शुक्रवारी जोहान्सबर्गमध्ये भेट झाली. २०२० मध्ये भारत-ऑस्ट्रेलियाच्या धोरणात्मक भागीदारीच्या विस्तारानंतर गेल्या पाच वर्षांत निर्माण झालेल्या गहन आणि वैविध्यपूर्ण सहकार्याबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भारतात अलीकडे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान अल्बानीज यांनी एकता व्यक्त केली.

दोन्ही नेत्यांनी दहशतवादाविरुद्ध जागतिक लढाई अधिक बळकट करण्याचे वचन दिले. त्यांनी राजकीय आणि धोरणात्मक संबंध, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, व्यापार व गुंतवणूक, महत्त्वाची खनिजे, तंत्रज्ञान, गतिशीलता, शिक्षण तसेच लोक-ते-लोक देवाणघेवाण यासह विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. पंतप्रधानांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय केला. भेटीदरम्यान, नियमित उच्चस्तरीय संपर्कामुळे भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना महत्त्वपूर्ण गती मिळाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया व्यापक धोरणात्मक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्याचा संकल्प केला.
भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्याशी खूप चांगली भेट झाली. आमच्या धोरणात्मक भागीदारीला पाच वर्ष पूर्ण झाले असून या काळात आमचे सहकार्य लक्षणीयरीत्या वाढले आहे. आजच्या चर्चेत मी संरक्षण आणि सुरक्षा, अणुऊर्जा आणि व्यापार या तीन प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला. याव्यतिरिक्त शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि इतर क्षेत्रांवरही तपशीलवार चर्चा झाली.