ज्ञानाचे भंडार वाढविण्यासाठी पुस्तकाचे वाचन आवश्यक

22 Nov 2025 22:14:29
नागपूर,
nitin-gadkari : वाचन संस्कृती आपल्यासाठी मनोरंजनाचा विषय नव्हे तर पुस्तकाच्या वाचनामुळे आपल्या व्यक्तीमत्वात बदल होतो. वाचण्याची सवय असल्यास आपले विचार बदलतात. नव्या कल्पना सुचतात. आपल्या समाजमनावर चांगल्या पुस्तकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे ज्ञानाचे भंडार वाढविण्यासाठी पुस्तके वाचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग नितीन गडकरी यांनी केले.
 
 

GADKARI 
 
 
रेशीमबाग मैदानावर नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा नऊ दिवसीय नागपूर बुक फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुस्तक प्रदर्शन स्थळाचे फित कापून नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी पुस्तक प्रदर्शनाची पाहणी केली.
 
 
या समारंभाला उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एनबीटी इंडिया अध्यक्ष प्रा. मिलिंद सुधाकर मराठे, प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी, झिरो माईल यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अजय संचेती आदी उपस्थित होते.
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तके आवश्यक
 
आपल्या भाषणात गडकरी पुढे म्हणाले, बालवयात मी बाबासाहेब पुरंदरे, रणजीत देसाई, शिवाजी सामंत यांची पुस्तके त्यांचा माझ्या जीवनावर चांगला परिणाम झाला आहे. पुस्तकातून जे विचार आपल्या हृदयापर्यंत पोहोचतात, त्यातून आपले व्यक्तिमत्व घडते. भारताचा गौरवशाली इतिहास, संस्कृत, परंपरा हीच आपली शक्ती आहे. विश्वगुरू होण्याच्या मार्गाने भारताने प्रवास सुरु केला असताना ज्ञानाची नितांत गरज पडणार आहे. आपले ज्ञान वाढविण्यासाठी ज्ञानवर्धक पुस्तके पुरक ठरणार आहे. आजच्या नवतंत्रज्ञानामुळे चित्र पूर्णत: बदललेले आहे. आगामी काळात मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुस्तके आवश्यक ठरणार आहे.
 
ज्ञानवर्धक पुस्तके वाचावे
 
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय पुस्तकांचा ज्ञान भंडार इंग्रजांनी येथून लुटून नेल्यानंतर चुकीचा प्रचार प्रसार करण्यात आला आहे. भारतीय नागरिकांनी आपली संस्कृती जपण्यासाठी ज्ञानवर्धक पुस्तके वाचून काढली पाहिजेत.
 
 
वाचन संस्कृती वाढविण्यासाठी या पुस्तक माध्यमातून पुस्तके खरेदी करणे आणि ही पुस्तके वाचणे आवश्यक झाले आहे. शाळा- महाविद्यालयातील युवक पुस्तके वाचत नाही , हा पूर्णपणे चुकीचा गैरसमज आहे. मोबाईलच्या युगात सर्वाधिक पुस्तके विकल्या जात असल्याचे पुण्यातील पुस्तक महोत्सवाने दाखवून दिले आहे. पुढील वर्षी होणार्‍या पुस्तक मेळाव्यात ८०० स्टॉल राहणार असून किमान १०० कोटींची पुस्तके जातील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
 
खर्‍या अर्थाने नागपूरकरांचा महोत्सव
 
 
प्रा. मिलिंद मराठे यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, पुण्यानंतर आता पहिल्यांदाच नागपूर बुक फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. मध्यवर्ती नागपूर शहरात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी या महोत्सावाची मदत होणार आहे. महोत्सवात ३०० प्रकाशक आणि १५ लाख पुस्तके असल्याने अनेक पुस्तके येथे मिळणार आहे. हा पुस्तक मेळावा खर्‍या अर्थाने नागपूरकरांचा महोत्सव असल्याचे मिलिंद मराठे यांनी सांगितले. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय जडण्यासाठी पुस्तक महोत्सवाचे मोठे योगदान असल्याचे प्रसिध्द लेखक अमीश त्रिपाठी यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0