शेअर्स मार्केटच्या नावाखाली २.५८ कोटींची फसवणूक:आरोपीला नागपूरात बेड्या

22 Nov 2025 22:04:17
अकोला,
share-market-fraud : शेअर्स मार्केट ट्रेडिंग मध्ये नफा मिळवून देण्याच्या अश्वासनावर फिर्यादीने तब्बल २ कोटी ५८ लाख २१ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.नफ्यासंदर्भात विचारणा केली असता आरोपीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादिने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यानुसार सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करीत आरोपीला शुक्रवार, २१ रोजी नागपूर येथून अटक केली.सोनु उर्फ सरिंदर नरेंद्र पतले (३२) रा. नागपुर, जैद तनविर खान, (२१), नागपुर असे आरोपीचे नावे आहेत.
 
KL
 
फिर्यादी अजय दिनकर देशपांडे, रा.अकोला यांनी १२ मे २०२५ रोजी सिव्हील लाईन येथे तक्रार दिली की, त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडींग मध्ये गुंतवणूक केली की जास्त नफा मिळवून देईल असे आश्वासन दिले, त्यानंतर फिर्यादी यांनी अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याचे सांगण्याप्रमाणे एकूण २ कोटी ५८ लाख २१ हजार रूपये रकमेची गुंतवणूक केली.त्यानंतर फिर्यादी यांनी झालेल्या नफ्याबाबत अज्ञात व्यक्तीस विचारणा केली असता फिर्यादीस उडवाउडवीचे उत्तरे दिली व आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले.तेव्हा फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे समजले वरून त्यांनी पो. स्टे. सिव्हील लाईन येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच डिजिटल खुणा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. ही कारवाई अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.अनिल जुमळे, सपोनी मनिषा तायडे पोस्टे. सायबर अकोला, पोउपनि संदीप बालोद व पोहवा. प्रशांत केदारे, अतुल अजने व तेजस देशमुख पोस्टे सायबर यांनी केली.
 
 
२७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी
 
दोन्ही आरोपींना नागपुर येथून शुक्रवारी स्थानिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.शनिवारी ५ वे दिवानी न्यायलयादिश कनिष्ठ स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, अकोला येथे हजर केले व सहा.सरकारी अभियोक्ता शैलेष शाहु यांनी सरकार तर्फे बाजु मांडली असता न्यायालयाने २७ नोव्हेंबर पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0