मुंबई,
Shinde's assurance to sisters लाडकी बहीण योजनेसंदर्भातील वाढता संभ्रम आणि विरोधकांच्या आरोपांमध्ये अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडत महिलांना मोठा दिलासा दिला आहे. पालघर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी ठामपणे सांगितले की लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी ही योजना सुरू केली आहे. अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांच्या खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात.

विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या या योजनेमुळे महायुतीला मोठा राजकीय फायदा झाल्याचेही समोर आले होते. प्रचारादरम्यान महायुती नेत्यांनी सन्मान निधी २,१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, योजनेत पात्र नसलेल्या महिलांनी लाभ घेत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर सरकारने नियम कडक केले आहेत. तिजोरीवरील वाढता भार कमी करण्यासाठी व पात्र महिलांच्याच खात्यात निधी पोचावा यासाठी केवायसी सक्तीचे करण्यात आले. सुरुवातीला १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती; मात्र महिला मोठ्या संख्येने केवायसीसाठी पुढे येत असल्याने शासनाने अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
तथापि, काही महिलांची नावे योजनेतून कमी झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. ही योजना लवकरच बंद होणार असल्याचे दावे करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की महिला काळजी करू नयेत. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कोणाच्याही मनात शंका राहू देऊ नका, असे ते म्हणाले. त्यांच्या आश्वासनाने लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून योजनेबाबतचा सगळा संभ्रम दूर झाल्याचे मानले जात आहे.