कॉनकॉर्ड,
Shooting at Christmas party in America नॉर्थ कॅरोलिनाच्या कॉनकॉर्ड शहरात वार्षिक ख्रिसमस सेलिब्रेशनदरम्यान गोळीबाराची घटना घडली असून, चार जण जखमी झाले आहेत. शहरातील २८ व्या वार्षिक ख्रिसमस ट्री लाइटिंग समारंभात ही घटना घडली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये गोळीबाराचे धक्कादायक दृश्य आणि गर्दीतून पळणाऱ्या लोकांचा प्रकार दिसून येत आहे. कॉनकॉर्ड पोलिसांनी तात्काळ कारवाई करून चर्च स्ट्रीट आणि कॅबरस अव्हेन्यूज परिसराला घेराव घालून तपास सुरू केला आहे. गोळीबार कोणी केला, हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र सुरक्षा संस्था याबाबत चौकशी करत आहेत.

कॉनकॉर्ड पोलिस मेजर पॅट्रिक टियरनी यांनी सांगितले की, संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास, कार्यक्रम केंद्राजवळील युनियन स्ट्रीटवरील कॉर्बिन अव्हेन्यूज जवळ गोळीबार झाला. शहरातील अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली असून, इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. जखमी, संशयित किंवा हेतू याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. माहिती असलेल्या नागरिकांनी कॉनकॉर्ड पोलिस विभागाशी ९२०-५०२७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही, २२ नोव्हेंबर रोजी होणारी ख्रिसमस परेड अद्याप रद्द झालेली नाही.