लावणी करताना श्रद्धा कपूरला दुखापत

22 Nov 2025 14:31:24
मुंबई, 
Shraddha Kapoor injured बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘ईथा’ या तमाशा कलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र या चित्रीकरणादरम्यान श्रद्धाला झालेल्या दुखापतीमुळे शूटिंगला अचानक ब्रेक लागला आहे. दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेड्युलमध्ये श्रद्धा लावणीच्या एका अवघड डान्स सीक्वेन्सचे चित्रीकरण करत होती. नऊवारी साडी, दागदागिने, कमरपट्टा अशा जड वेषभूषेत ती अनेक टेक देत होती. अजय–अतुलच्या गाण्यावर नृत्य करताना एका क्षणी तिने संपूर्ण वजन डाव्या पायावर टाकले आणि अचानक तोल गेल्याने ती कोसळली. यामध्ये तिच्या पायाला दुखापत होऊन किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचे पुढे समोर आले.
 
 
Shraddha Kapoor injured
 
 
विठाबाईंची भूमिका साकारण्यासाठी श्रद्धाने १५ किलोपेक्षा अधिक वजन वाढवले आहे. या जड वजनासह केलेल्या कठीण डान्समुळे ही दुखापत वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नाशिकमधून परतल्यानंतरही श्रद्धा मुंबईतील मड आयलंड स्टुडिओमध्ये काही भावनिक दृश्यांचे शूट करण्यासाठी सज्ज झाली होती. पण वेदना वाढल्याने युनिटला चित्रीकरण थांबवावे लागले. आता टीम दोन आठवड्यांनंतर शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असून श्रद्धा पूर्णपणे बरी होईपर्यंत विश्रांती घेणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नसली तरी १ नोव्हेंबरपासून शूटिंगला सुरुवात झाली आहे. पुढील शेड्युल सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा येथे पार पडणार आहे. तमाशा क्षेत्रातील दिग्गज कलाकार विठाबाई नारायणगांवकर ज्यांना 1957 आणि 1990 मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. यांची भूमिका श्रद्धा मोठ्या समर्पणाने साकारत असल्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0