जीर्ण अंगणवाडीतून चिमुकल्यांना धडे

22 Nov 2025 21:54:39
सडक अर्जुनी, 
Types in Chichtola : येथील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या निर्मल ग्राम पुरस्कृत चिचटोला येथील अंगणवाडी केंद्राची इमारत जीर्ण असून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन नवीन अंगणवाडी इमारत उभारावी, अशी मागणी पालकांसह नागरिकांनी केली आहे.
 
 
J
 
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत सन २००७ मध्ये चिचटोला गावाने विदर्भातून द्वितीय क्रमांक पटकाविला होता. त्यामुळे या गावाची स्वच्छ गाव, सुंदर गाव अशी ओळख निर्माण झाली. तसेच येथील जिल्हा परिषद शाळेने विविध स्पर्धेसह उपक्रमात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविले आहे. परंतु, अंगणवाडी केंद्राच्या जीर्ण इमारतीकडे संबंधितांचे का दुर्लक्ष होते, हा प्रश्न आहे. येथील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे बांधकाम १९८७-८८ वर्षी झाले. २०१५-१६ मध्ये ग्रामपंचायतीअंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून अंगणवाडी केंद्राची दुरुस्ती करण्यात आली होती. नवीन इमारत आज होईल, उद्या होईल, या आशेवरच आजपर्यंत ढकलगाडा चालत आहे. या जीर्ण इमारतीत ३५ विद्यार्थी विद्यार्जन करत आहेत. त्यांच्या जिवाला कधीही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने नवीन अंगणवाडी केंद्र इमारत मंजूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
 
 
जीर्ण अंगणवाडी इमारतीबाबतचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये मांडला आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्‍या नवीन मंजुरी बांधकामात चिचटोला येथील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचा समावेश होईल, यासाठी मी प्रयत्नरत आहे.
सुधा रहांगडाले
जिल्हा परिषद सदस्य, पांढरी
Powered By Sangraha 9.0