नागपूर,
sardar-vallabhbhai-patel देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० जयंती निमित्याने जिल्हास्तरीय पदयात्रा 'युनिटी मार्च' शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला. भारत सरकारचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत मेरा युवा भारत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराज बाग चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरातून निघालेल्या 'युनिटी मार्च' मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागपूर शहराचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी भूषविले, यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, मेरा युवा भारत अभियानाचे उपनिदेशक शिवधन शर्मा, स्काऊट अँड गाईडच्या हेमा वानखडे, क्रीडा अधिकारी स्वप्निल बनसोडे, एनसीसीचे आर. बी. पटले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मेरा युवा भारत अभियानाचे उपनिदेशक शिवधन शर्मा यांनी प्रास्ताविक करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने संपूर्ण देशात युनिटी मार्च आयोजित केले जात असल्याची माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारत तसेच नशामुक्त भारताची शपथ दिली.
अध्यक्षीय भाषण करताना संतोष खांडरे यांनी तरुणांच्या ऊर्जेचा वापर देशाच्या प्रगतीसाठी व्हावा असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तत्पूर्वी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी लघु नाटिका सादर केली. त्यानंतर विद्यापीठ परिसरातून निघालेली पदयात्रा बर्डी, झिरो माईल मार्गे परत येत समारोप करण्यात आला. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स, स्काऊट गाईड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.