नागपूर,
adivasi-gowari-memorial-day : समाजाच्या विविध मागण्या घेऊन विधिमंडळावर शांततेने मोर्चाने आलेल्या तसेच चेंगराचेंगरी होऊन मरण पावलेल्या 114 आदिवासी गोवारी बांधवांना आज रविवारी हजारोंच्या संख्येने आलेल्या गोवारी बांधवांसह विविध संघटनांनी श्रद्धांजली अर्पण केली. हौतात्म्य पत्करलेल्या आप्तेष्टांच्या आठवणीने गहिवरून येताना अश्रूंनी डबडबलेले डोळे नि अद्यापही न्याय मिळाला नसल्याने उरात संताप, असे संमिश्र भाव प्रत्येकातच दिसत होता.
रविवारी सकाळपासूनच शून्य मैलाजवळील स्मारकाजवळ गोवारी बांधव एकत्र येऊ लागले. नागपूरसह, भंडारा, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतून गोवारी बांधव येत होते. हुतात्मा गोवारी स्मारकाजवळ लागलेल्या बॅनरवर आप्तेष्टाचे फोटो पाहून त्यांचे डोळे भरून येत होते. काही लोक आपल्या लहान मुलांसह आते होते. महिलांची संख्याही बरीच मोठी होती.
या गर्दीत भेटलेल्या दोन-तीन दाम्पत्यांनी त्या काळ्या दिवसाच्या आठवणींना वाट मोकळी करून दिली. गोवारींना अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्याच्या मागणीसाठी 23 नोव्हेंबर 1994 रोजी हजारो गोवारी बांधवांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. सायंकाळ होत असतानाच अचानक चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधवांना प्राण गमवावे लागले. या घटनेला 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, न्यायाच्या प्रतीक्षेत हा समाज आजही लढा देतो आहे, हे सांगताना या दाम्पत्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
या काळ्या स्मृतींच्या आठवणीत दरवर्षी गोवारी समाज बांधव गोवारी हुतात्मा स्मारकावर एकवटतात. आज सकाळी आदिवासी गोवारी समाज संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष कैलास राऊत यांनी स्मारकावर अभिवादन केले. अनेक सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी कार्यकत्यांनीही येथे श्रद्धांजली अर्पण केली. आदिवासी गोवारींच्या परंपरागत वाद्यांसह काही संघटनांनी रॅली काढली. यात मोठ्या प्रमाणात तरुण विद्यार्थ्यांचा समावेश होता.
आदिवासी गोवारी बांधव 23 नोव्हेंबर 1994 हा दिवस आठवताना आजही शहारे अनुभवतात. स्मारकावर नतमस्तक होताना मनोमन वेदनांची फुले अर्पण करतात. आ. विकास ठाकरे व केतन ठाकरे यांच्यासह काही संघटनांनी भोजनाची व्यवस्था केली होती. ‘आरक्षण लेके रहेंगे लेके रहेंगे’... घोषणा देतच गोवारी बांधव आपापल्या गावी परतत होते.