तळेगाव (श्या. पं.),
accident : नादुरुस्त ट्रॅटरच्या टँकरवर भरधाव कार धडकल्याने झालेल्या अपघातात दस्तगरी खान (५२) आणि दिलीप पाटील (६५) रा. आष्टी हे दोघे जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार २२ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास आष्टी ते तळेगाव (श्या.पं.) या राष्ट्रीय महामार्गावरील गौरक्षण जवळ घडली.
आष्टी येथील दिलीप पाटील हे लग्नकार्यावरून गावाला परत येत असताना त्यांची कार दस्तगीर खान हा चालवत होता. या कारमध्ये दिलीप पाटील यांच्या भावाचे कुटुंब होते. शहराच्या हद्दीत येताना आष्टी ते तळेगाव मार्गावरील गौरक्षण जवळ एम. एच. ३० ए. बी. ६४०८ क्रमांकाचा नादुरुस्त टँकर उभा होता.
अंधारात उभा असलेला टँकर चालक दस्तगीर खान यांना दिसला नाही आणि भरधाव कार टँकरवर जाऊन आदळली. यात चालक दस्तगीर खान आणि दिलीप पाटील यांच्या जागीच मृत्यू झाला तर मागे बसून असलेले रागिणी दिलीप पाटील (६०), विजय पाटील (६०), संगीता पाटील (५०) हे गंभीर जखमी झाले. जखमींना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात कारचा चेंदा मेंदा झाला. ठाणेदार जोशी यांनी पोलिस बंदोबस्तात अपघातग्रस्त वाहने घटनास्थळवरून हलवून वाहतूक सुरळीत केली.