दर्जेदार पुस्तके तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याची नितांत गरज

23 Nov 2025 20:55:03
नागपूर, 
Devendra Fadnavis : गुगल, चॅट जीपीटी, एआयच्या युगात माहिती ही ज्ञानामध्ये परिवर्तित होत नाही तोवर ती केवळ माहिती असते. त्यामुळे माहितीकडून ज्ञानाकडे जायचे असेल आणि ज्ञानी म्हणून नावलौकीक मिळवायचा असेल पुस्तकांशिवाय पर्याय नाही. आजच्या तरुण पिढीपर्यंत दर्जेदार पुस्तके पोहोचविण्याची नितांत गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 

CM 
 
 
 
नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाच्या वतीने व महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर बुक फेस्टिव्हल अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
याप्रसंगी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरू व साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा डॉ. कुमुद शर्मा, प्रसिध्द लेखक व शिवकथाकार विजयराव देशमुख, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, झिरो माईल यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शक सत्यनारायण नुवाल, अजय संचेती, संचालक समय बनसोड आदी उपस्थित होते.
 
समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारे नागपूर शहर
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, नागपूर हे समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारे शहर असून देशाला दिशा देणारे आणि दिशा देणार्‍या अनेक घटनांचे साक्षीदार असलेले हे सांस्कृतिक शहर आहे. गोंड राजांनी सार्वजनिक ग्रंथालयाची परंपरा सुरू करून ज्ञानसंस्कृती रुजवली. भोसले हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात नागपूरने मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य हे अभिजात आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राजा बढे, राम शेवाळकर, महेश एलकुंचवार, सुरेश भट, ग्रेस, वि.भि. कोलते, ग.त्र्यं. माडखोलकर, मारुती चितमपल्ली, परशुराम खुणे यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी या संस्कृतीला समृद्ध करण्याचे काम केले आहे. विदर्भाची भूमी ही भाषेच्या भूमी आहे. मराठी आणि हिंदी साहित्य निर्मितीची समांतर समृद्ध परंपरा येथे पहायला मिळते. लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागपूरच्या सांस्कृतिक जडणघडणीत अत्यंत मोठा असा बदल होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते
 
 
मनुष्याला मानवी संवेदना असल्याने संवेदना अभिव्यक्त करण्याचे वरदान मनुष्याला लाभले आहे. ही अभिव्यक्ती करण्यासाठी त्याच्याकडे साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. त्यामुळे ही प्रगल्भ संस्कृती जपण्याची गरज असून हा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम पुस्तकांच्या माध्यमातून होत असते. नागपूर पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वैचारिक कक्षा रुंदावून प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र यांनी विविध पुस्तक प्रकाशनांच्या स्टॅाल्सला भेट दिली. तसेच बालमंडपला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
 
 
नवभारताच्या उभारणीची साक्ष देणारा
 
प्रसिध्द लेखक व शिवकथाकार विजयराव देशमुख म्हणाले, यवनांच्या आक्रमणानंतर आपली संस्कृती लयास गेली, परंतु शिवछत्रपतींनी मराठी भाषेची आणि भारतीय संस्कृतीची पुन्हा प्रतिष्ठापना केली. हा पुस्तक महोत्सव त्या परंपरेचा वारसा नेणारा आहे. आज ३५० वर्षांनंतर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि मोहनजी भागवत यांच्या नेतृत्वात नवे राष्ट्र उभारताना दिसत आहे. हा महोत्सव त्या नवभारताच्या उभारणीची साक्ष देणारा आहे.
 
 
वाचन संस्कृती जोपासण्याची गरज
 
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, आजच्या एआयच्या युगात वाचनाची गरज सर्वाधिक आहे आणि त्या हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमामुळे वाचनाला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तक महोत्सवाचे महत्त्व अधिक आहे. वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. या ३०० हून अधिक प्रकाशक आणि १५ लाखांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवकथाकार विजयराव देशमुख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत कुकडे, कल्याण देशपांडे, वेदिका मिश्रा आदींनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0