अल्लीपूर,
fake-liquor-factory : शेतामध्ये सुरू असलेल्या नकली दारू तयार करणार्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत देशी दारू, विविध विदेशी कंपन्यांचे लेबल्स असा ११ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोनेगाव स्टेशन शेत परिसरात अल्लीपूर पोलिसांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुयातील सोनेगाव स्टेशन येथील शेत परिसरात नकली दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी छापा टाकला. घटनास्थळी व्हाईट कंपनीची विदेशी दारू, रॉयल ब्ल्यू विदेशी दारू तसेच रॉयल स्टॅग कंपनीचे हजारो नकली प्रिंट केलेले लेबल्स सापडले. पोलिसांनी ११ लाख २७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शेत अल्लीपूर येथील प्रशांत चंदनखेडे याचे असल्याची माहिती पुढे आली आहे. कारवाईची भनक लागताच कारखाना चालवणारा घटनास्थळावरून पसार झाला. चंदनखेडे अनेक वर्षांपासून दारू व्यवसायात असल्याची चर्चा आहे. काही लोकांनी वरिष्ठ अधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचेही सांगितले जात आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अतिरित पोलिस अधीक्षक डॉ. सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली अल्लीपूरचे ठाणेदार विजयकुमार घुले, पोलिस उपनिरीक्षक वर्षा तांदुलकर व अल्लीपूर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.