वर्धा,
fake-note-printing-case : शहरातील केजाजी चौकात उघड झालेल्या नकली नोट छपाई प्रकरणात गंभीर खुलासे समोर आले आहेत. मुख्य आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. आता नाशिकमध्ये पकडलेल्या आरोपीच्या दोन साथीदारांना पुढील तपासासाठी वर्धा पोलिस ताब्यात घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केजाजी चौकात डॉ. तळवेकर यांच्या घरात भाड्याने राहणारा ईश्वर यादव गेल्या वर्षभरापासून बनावट नोटा छापण्याचे काम करत होता. त्याचे दोन सहकारी धनराज थोटे आणि राहुल आंबटकर यांना नाशिकमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. भनक लागताच ईश्वर यादव घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी घरातून काही बनावट नोटा आणि छपाईसाठी लागणारे साहित्य जप्त केले होते. त्यानंतर नागपूर परिसरातून ईश्वर यादवला अटक करण्यात आली.
पोलिस कोठडीत असताना त्याने दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यातून पुन्हा मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि साहित्य जप्त करण्यात आले. २४ रोजी आरोपी ईश्वर यादवची पोलिस कोठडी संपत आहे. त्याला पुन्हा न्यायालयात हजर करून अधिक कोठडीची मागणी करण्यात येण्याची शयता आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मध्यप्रदेश, नाशिक आणि इतर काही जिल्ह्यांपर्यंत पोहोचले असल्याने नाशिकमध्ये पकडलेल्या दोन्ही आरोपींना वर्धा पोलिस कोणत्याही वेळी ताब्यात घेऊ शकतात. यानंतर आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शयता आहे.