नागपूर,
onion-storage-machine : स्वस्त असताना बहुतेक जण अधिकचा कांदा खरेदी करून साठवून ठेवतात. परंतु यातील बराच कांदा खराब हाेताे. त्यामुळेही आर्थिक नुकसानही हाेते. यावर उपाय म्हणून काटाेल येथील लव आणि सुचिता पांडे या बहीण भावांनी कांदा साठवणूक यंत्रणा विकसित केली आहे. या तंत्रज्ञानाने अगदी दाेन मिनिटात खराब कांदा कुठल्या भागात आहे ते कळताे. तसेच या यंत्रणेमुळे सहा ते आठ महिने कांदा चांगला राहताे.

कांदा हा प्रत्येक स्वयंपाक घरातील राजासमान असताे. प्रत्येक भाजीत त्याची गरज पडते. त्याची किंमत वाढली की कांद्याने रडविले असे आपण म्हणताे. त्यामुळे कांदा स्वस्त असताना ताे अधिकचा घेऊन ठेवण्यावर अनेक जण भर देतात. परंतु कधी वातावरणामुळे व इतरही कारणामुळे कांदा खराब हाेताे. विशेष म्हणजे खराब झालेला एक कांदा इतर कांदे खराब करताे. यावर उपाय म्हणून पांडे बहीण भावांनी एक यंत्र तयार केले आहे. अग्राेव्हिजन मध्ये या यंत्राविषयी दिलेल्या माहितीनुसार घरगुती वापरासाठी त्यांनी लाेखंडी गाेल जाळी तयार केली आहे. यात मध्यभागी एक पाईप असून त्यात एक पंखा बसविण्यात आला आहे. तसेच हवा खेळती राहण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे कांद्यातील आर्द्रता नाहिशी हाेत ताे अधिक काळ टिकताे.
कांद्यात अमाेनिया ग्रॅस असताे. त्यामुळे आरएच गॅस डिटेक्ट यंत्र या यंत्रणेत बसविण्यात आले आहे. या माध्यमातून या कठड्यात साठविलेल्या कांद्यातून सडका कांदा कुठे आहे लक्षात येते. ताे काढून खराब हाेणारे इतर कांदे वाचविता येत असल्याचे लव पांडे सांगतात. हे लहान यंत्र घरगुती वापरासाठी असून दहा टनापर्यंत कांदा साठवणूक हाेईल अशी माेठी रचना तयार करून देत असल्याची माहिती पांडे यांनी दिली.