our-toilet-our-future-campaign शौचालय ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज आहे, ही भूमिका ठेवून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १९ नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनापासून ते १० डिसेंबर या मानवी हक दिनापर्यंत ‘आमचे शौचालय, आमचे भविष्य’ ही मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत असून याअंतर्गत गावागावातील वैयतिक व सार्वजनिक शौचालयांची तपासणी प्रशासनाकडून केली जाणार आहे.
या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयतिक शौचालय व सार्वजनिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभिकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. our-toilet-our-future-campaign अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालय तसेच वैयतिक शौचालय याची ग्रामपंचायतच्या वतीने नोंद घेऊन त्याची दुरुस्ती व सुशोभिकरण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच शौचालय बांधून आहेत, परंतु त्यांचा वापर होत नसेल तर याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यात यावे. विशेषत: शाळा व अंगणवाडीतील शौचालयांची तत्काळ दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात यावी. या अभियानामध्ये शाळा, अंगणवाडी, स्वयंसहायता बचतगट, युवक मंडळे तसेच सर्व स्तरातील ग्रामस्थ यांचा सहभाग घेऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण व स्वच्छतेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना त्यांच्या वैयतिक शौचालयांची रंगरंगोटी सुशोभिकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी सूचना द्याव्यात. वैयतिक व सामूदायिक शौचालयांची उत्तम देखभाल व सुशोभिकरण करणार्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहित करण्यात येणार असून या अभियानात उत्कृष्ट काम करणार्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येणार आहे.