मानोरा,
rabi sowing, अतिवृष्टीच्या दृष्ट ग्रहणाने नाउमेद न होता तालुक्यातील शेतकरी मोठ्या उत्साहाने रब्बी हंगामाच्या पेरणीमध्ये सध्या व्यस्त असल्याचा सहाही महसूल मंडळामध्ये निदर्शनास येत आहे. पावसाळा यंदा जास्त प्रमाणात झाला, पेरणीला थोडा उशीर झाला पण शेतकर्यांनी चिकाटी कायम ठेऊन रब्बी हंगामात पेरणीस प्रारंभ केला आहे.
कापूस वेचणी आणि रब्बी पेरणी ही दोन्ही कामे एकाच वेळी आल्याने मजूर मिळत नसल्याने शेतकर्यांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी मशागत पूर्ण केली असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे. संकटांवर मात करत शेतकरी नव्या, आत्मविश्वासाने रब्बी हंगामात उतरले असून खते, बी-बियाणे, यंत्रसामग्री यांची खरेदी करून शेतकरी नियोजनबद्ध पद्धतीने शेतीकाम सुरू करत असताना दिसुन येत आहे. परिसरात गहू आणि हरभरा तसेच नाविन्यपूर्ण पिक चिया या पिकाची पेरणी जोमाने सुरू असून, बळीराजाची जिद्द ग्रामीण भागात आशेचा नवा किरण निर्माण करीत आहे. यंदा पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने विहिरीतील पाणीसाठा भरपूर प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात या भागात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकर्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी चियाची पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.