विनापरवाना कीटकनाशके व खते विक्री करणार्‍या केंद्रावर धाड

23 Nov 2025 15:46:09
सेलू, 
raid-on-center-selling-pesticides शेतकर्‍यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने सिंदी रेल्वे येथे मोठी कारवाई करत विनापरवाना व मुदतबाह्य कीटकनाशके तसेच खते विक्री करणार्‍या केंद्रावर धाड टाकली. या कारवाईत ६ लाख ५५ हजार १०९ रुपये किंमतीचा अवैध कीटकनाशक व खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार २२ रोजी कृषी विभागाच्या भरारी पथकाने केली. ही कारवाई पदम बेताला (६५) रा. वार्ड १४, सिंदी रेल्वे यांच्या निवासस्थानी रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू होती.
 
 
raid-on-center-selling-pesticides
 
शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार, पदम बेताला अनधिकृतरित्या विनापरवाना तसेच मुदतबाह्य कीटकनाशके आणि खते विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. यावरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी ६.३० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत झडती घेऊन माल जप्त केला. शेतकर्‍यांची फसवणूक व बेकायदेशीर विक्रीप्रकरणी आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३, रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५, कीटकनाशक अधिनियम १९६८ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. raid-on-center-selling-pesticides ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. भरारी पथकात जिपचे कृषी विकास अधिकारी शिवा जाधव, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक प्रमोद पेटकर, नागपूर येथील विभागीय गुणनियंत्रक निरीक्षक संदीप पवार, तसेच सिंदी रेल्वेचे ठाणेदार नरेंद्र निस्वादे, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे, हर्षल सडमाके, सहाय्यक कृषी अधिकारी नितीन आव्हाळे, दीपक जाधव, वैभव निंबाळकर, पोलिस हवालदार चंद्रकांत भावरे आणि पोलिस अंमलदार मंगेश मुडे यांचा सहभाग होता. भरारी पथकाच्या या कारवाईमुळे वर्धा जिल्ह्यात बेकायदेशीररित्या कीटकनाशके व खते विक्री करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0