दुबई,
Dubai's inhumane decision दुबई एअर शोमध्ये तेजस फायटर जेट कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर भारताला केवळ आपल्या स्वदेशी विमानाचे नुकसान सहन करावे लागले नाही, तर शूर वैमानिक नमांश स्याल यांनाही या अपघातात गमवावे लागले. चित्तथरारक हवाई कसरतीदरम्यान तेजस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन जमिनीवर कोसळले आणि क्षणार्धात आगीचा प्रचंड लोळ उठला. उपस्थित प्रेक्षकांसमोर घडलेल्या या अपघाताने संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले, तर टीव्हीवर ही दृश्ये पाहणारे अनेक जण हेलावून गेले.
या दुर्घटनेने जगभरातून सहानुभूती आणि शोक व्यक्त केला जात असताना अमेरिकेच्या F-16 टीमने नमांश स्याल यांच्याप्रती आदर व्यक्त करत मोठा निर्णय घेतला. 21 नोव्हेंबरला नियोजित असलेला त्यांचा अंतिम परफॉर्मन्स त्यांनी रद्द केला. टीमचे कमांडर मेजर टेलर यांनी सांगितले की अपघातानंतर शोचे कार्यक्रम ज्या पद्धतीने निर्विकारपणे सुरू राहिले, ते पाहून त्यांना धक्का बसला. त्यांच्या मते, एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही दुबई वर्ल्ड सेंट्रलमध्ये सर्वकाही नेहमीप्रमाणे सुरू राहणे अत्यंत खटकणारे होते.
मेजर टेलर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की अपघातानंतर लगेचच स्पीकरवर रॉक अँड रोल संगीत वाजत राहिले, प्रेक्षक पुढील कसरतींचे शूटिंग करण्यात मग्न होते आणि प्रायोजकांचे आभार मानण्याचे कार्यक्रम सुरूच होते. अशा वेळेस ज्या प्रकारे उत्सवाचे वातावरण कायम ठेवले गेले, त्यावर मेजर टेलर यांनी रोष प्रकट केला. दरम्यान, नमांश स्याल यांच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची पत्नी देखील भारतीय वायुसेनेत अधिकारी असून संपूर्ण देशाने या शूर वैमानिकाला अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली.