बुलढाणा,
Shrikant Deshmukh speech महाराष्ट्रातील संतांची चळवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चळवळ होती ती केवळ सांप्रदायिक स्वरूपाची भक्तीची चळवळ नव्हती असे प्रतिपादन श्रीकांत देशमुख यांनी केले.
बुलढाणा येथील प्रगती सार्वजनिक वाचनालय व व्रिक्ष फाउंडेशनच्यावतीने आयोजित ज्ञानदान कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्रीकांत देशमुख बोलत होते.याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.दादा कवीश्वर होते. प्राचार्य डॉ.गोविंद गायकी यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्ष सुजाता कुल्ली आणि सचिव प्रा. डॉ. कि.वा वाघ हे उपस्थित होते.
संत साहित्याचे वर्तमान या विषयावर व्याख्यान देतांना ते पुढे म्हणाले ज्ञानेश्वरांपासून त्या त्या काळातील संतांनी परंपरे विरुद्ध बंड केले. संतांनी धर्माची चिकित्सा केली त्यांनी महाराष्ट्र धर्माचा खराखुरा पाया घातला. संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी ईश्वरभक्तीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला. अशा संतांकडे पाहण्याची पारंपारिक दृष्टी आपण बदलली पाहिजे .त्यांना देव बनवू नका. त्यांची मंदिरे बांधू नका. त्यांची शिकवण समजून घ्या. असे विचार व्यक्त केले.
प्रारंभी डॉ. स.त्र्यं कुल्ली आणि श्रीमती अरुणा कुल्ली यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून मान्यवरांनी अभिवादन केले .या कार्यक्रमात डॉ. एस. एम. कानडजे यांना साहित्य वैभव हा पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. शाल. श्रीफळ स्मृतीचिन्ह आणि दहा हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुजाता कुल्ली यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ गोविंद गायकी, डॉ.दादा कवीश्वर आणि डॉ.एस. एम. कानडजे यांची समयोचित भाषणे झाली. प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण नुकतेच झाले असून काही सोयी सुविधा वाचनालयात उपलब्ध व्हाव्या या दृष्टीने डॉ. एस. एम. कानडजे यांनी २१ हजार रुपये व पि.डी. सपकाळ यांनी दहा हजार रुपयाची देणगी प्रगती वाचनालयाला दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.कि.वा. वाघ यांनी केले या कार्यक्रमासाठी बुलढाणा शहरातील सुजान रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्रिक्ष फाउंडेशन व प्रगती परिवातील सद्स्यांनी पुढाकार घेतला होता.