10 लाख घेऊन येण्याचा दबाव अन् तिची आत्महत्या

24 Nov 2025 17:13:55
कोल्हापूर,
Marital suicide in Kolhapur कोल्हापूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक भयावह घटना उघड झाली असून, माहेरहून दहा लाख रुपये आणण्याच्या दबावाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याने परिसरातच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यातील विविध निवडणुकांचे तापलेले वातावरण आणि मुंबईतील एका आत्महत्येची ताजी आठवण असतानाच कोल्हापूरच्या कुरुंदवाड येथे घडलेल्या या घटनेने सर्वच स्तरांवर संताप व्यक्त केला जात आहे.
 
 
 

suicide 
कौसर गरगरे असे आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय विवाहितेचे नाव असून, तिच्यावर सासरकडून सतत आर्थिक मागण्या आणि मानसिक छळाचा मोठा ताण होता. कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत कौसर यांच्या सासऱ्यांनी उमेदवारी भरली होती. निवडणुकीत खर्च करण्यासाठी कौसरला माहेराहून तब्बल दहा लाख रुपये घेऊन येण्याची जबरदस्ती केली जात होती. या पैशांसाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता आणि त्यातून कौसरला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता.
 
या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या कौसरने गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घराच्या छताला गळफास घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबात आणि परिसरात शोककळा पसरली. कौसरचे भाऊ अल्ताफ आवटी यांनी कुरुंदवाड पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कौसरचा पती, सासू, सासरे आणि जावे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. निवडणुकीसाठी निधी उभा करण्याच्या दबावाखाली एका महिलेने जीव देणे ही अत्यंत गंभीर आणि असह्य बाब असल्याचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0